नागोठण्यातील नुक्कड गल्ली ‘नो पार्किंग’ पाट्यांची गरज; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे पोलीस स्टेशनलगत असलेल्या नुक्कड गल्लीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गेले अनेक वर्षे हा प्रश्न कायम असतानाही त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नुक्कड गल्ली हा नागोठणे गावातून बाहेर पडण्याचा प्रमुख मार्ग असून या रस्त्यावरून कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी, श्री जोगेश्वरी मातेचे भाविक, पोस्ट ऑफिस व पोलीस स्टेशनमध्ये ये-जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतुकीचा ताण असतो.
पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत नागरिक व पत्रकारांनी या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधले. मात्र, अद्यापही वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक सुज्ञ नागरिकांनी शांतता समितीच्या बैठकींकडे पाठ फिरविल्याचेही दिसून येत आहे.
नुक्कड गल्लीसमोरच एस.टी. स्टँडमध्ये पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असतानाही अनेक वाहनचालक गल्लीतच वाहने उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यास हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
नागोठणे शहरात वाढती वाहने, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारे पार्किंग आणि वाढती लोकसंख्या यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक गावांतील नागरिक तसेच रिलायन्सच्या वाढीव प्रकल्पासाठी आलेले परप्रांतीय कामगार नागोठणे परिसरात वास्तव्यास असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे.
काही वर्षांपूर्वी नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी देविदास सोनवणे यांनी ‘पी-१’ आणि ‘पी-२’ ही वाहतूक नियंत्रणाची संकल्पना राबवून वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा केली होती. त्यामुळे त्याकाळात वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला होता.
आता नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी हे या समस्येवर कोणत्या उपाययोजना करतात, याकडे संपूर्ण नागोठणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

