मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी नागोठण्यात ट्रॉमा सेंटर उभारावे : समृद्धी कोळी यांची खासदार सुनील तटकरे यांच्याकडे मागणी

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी नागोठण्यात ट्रॉमा सेंटर उभारावे : समृद्धी कोळी यांची खासदार सुनील तटकरे यांच्याकडे मागणी

नागोठणे (शामकांत नेरपगार ): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती रोहा सदस्या सौ. समृद्धी संतोष कोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्री. सुनील तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासदार सुनील तटकरे यांना गीताबाग येथील कार्यालयात निवेदन देताना सौ. समृद्धी संतोष कोळी, जेष्ठ नेते शिवरामभाऊ शिंदे, राष्ट्रवादी नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, कार्याध्यक्ष सचिन कळसकर, राजेंद्र शिंदे,रोशन पारंगे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गालगत महत्त्वाच्या ठिकाणी असून या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे अपघातांच्या घटनाही वारंवार घडतात. मात्र नागोठणे परिसरात पुढील ४० ते ६० किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही सुसज्ज आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांना तातडीचा उपचार मिळण्यात अडचणी येतात.
नागोठणे व परिसरातील सुमारे १०० ते १२५ गावे आणि वाड्यांतील नागरिक या आरोग्य केंद्रावर अवलंबून असून आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी होणारा विलंब अनेकदा जीवावर बेतत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले ट्रॉमा सेंटर उभारल्यास अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल तसेच संपूर्ण परिसरातील आरोग्य सेवेत मोठी सुधारणा होईल, असे मत सौ. समृद्धी कोळी यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!