धक-धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या हस्ते उरणमध्ये पीएनजी ज्वेलर्सचे दिमाखात उद्घाटन
नागोठणे (शामकांत नेरपगार)
उरण शहरात नामांकित दागिने ब्रँड पीएनजी ज्वेलर्स च्या नव्या शोरूमचे उद्घाटन धक धक गर्ल सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, पनवेल नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, तसेच पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, उरण शहर पूर्वीपासून सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. उरण म्हणजे सोने असेच समीकरण बनले आहे. येथे विविध जाती-जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. विशेषतः आगरी-कोळी समाजाची वस्ती मोठी असून हा समाज अत्यंत कष्टाळू आहे. मेहनतीच्या पैशांतून सोने खरेदी करण्याची परंपरा येथील महिलांमध्ये असल्यामुळे उरणमध्ये दागिन्यांच्या बाजाराला विशेष महत्त्व आहे.
पीएनजी ज्वेलर्सने उरण शहरात व्यवसाय सुरू करून महत्त्वाचे पाऊल टाकले असून हा ब्रँड विशेषतः तरुणाईमध्ये लोकप्रिय होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरुण पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन पीएनजीने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. आजोबांच्या वारशाला पुढील पिढीने मोठ्या प्रमाणावर पुढे नेले असून ते फक्त सोने विकत नाहीत, तर ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नातेही जपत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी एकेकाळी ‘धक-धक गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते उरणमध्ये पीएनजी ज्वेलर्सचे उद्घाटन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी पीएनजी ज्वेलर्सला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान पीएनजी ज्वेलर्सतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महेंद्रशेठ घरत यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.

