नागोठणेकरांच्या शुद्ध पाण्याच्या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांची तातडीची दखल शनिवारी नागोठणे फिल्टर प्लॅन्टची पाहणी; संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

नागोठणेकरांच्या शुद्ध पाण्याच्या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांची तातडीची दखल

शनिवारी नागोठणे फिल्टर प्लॅन्टची पाहणी; संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या मातीमिश्रित व अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येची दखल घेत नागोठणे गावातील प्रमुख मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच स्थानिक नेतेगणांनी गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार लोकनेते सुनील तटकरे यांची भेट घेतल्यानंतर नागोठणेकरांना भेडसावत असलेली अशुद्ध पाणीपुरवठ्याची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन ढोले, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील, राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके, किशोरभाई जैन, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच विलास चौलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठण्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसंदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सविस्तर माहिती घेतली. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नागोठण्यात यापूर्वी झालेल्या कामाची सद्यस्थिती, योजनेवर झालेला खर्च तसेच योजना आजतागायत कार्यान्वित का झाली नाही, याबाबत माहिती घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा परिपूर्ण अभ्यास करून शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी नागोठणे येथील फिल्टर प्लॅन्टला स्वतः भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि या गंभीर प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खासदार तटकरे यांनी नागोठणेकरांना दिले.

विशेष म्हणजे, नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील सर्व संबंधित शासकीय अधिकारी व विभागांच्या प्रतिनिधींनी शनिवारच्या पाहणीवेळी नागोठणे फिल्टर प्लॅन्टच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आदेशही खासदार तटकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शुद्ध पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागोठणेकरांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. शनिवारच्या नागोठणे फिल्टर प्लॅन्ट पाहणीदरम्यान नेमका कोणता तोडगा निघतो आणि नागोठणेकरांना प्रत्यक्षात शुद्ध पाणी कधी मिळते, याकडे आता संपूर्ण नागोठण्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!