अदाणी ग्रुपच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूषण टके यांची ‘रॅम्प सुपरवायझर’ म्हणून नियुक्ती : टके कुटुंबियांकडून सत्कार

अदाणी ग्रुपच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूषण टके यांची ‘रॅम्प सुपरवायझर’ म्हणून नियुक्ती

टके कुटुंबियांकडून सत्कार

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे विभाग नाभिक समाजाचे अध्यक्ष तथा तरुण कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ बाळासाहेब टके यांच्या निवासस्थानी नवरात्रोत्सवानिमित्त टके कुटुंबीयांच्या कुलदैवताची घटस्थापना करण्यात आली. या मंगलमय प्रसंगाचे औचित्य साधून टके कुटुंबीयांचे सुपुत्र भूषण शैलेश टके यांची अदाणी ग्रुपच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘रॅम्प सुपरवायझर’ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके व नागोठणे विभाग नाभिक समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीपभाई टके कुटुंबीय, बाळासाहेब टके कुटुंबीय तसेच संपूर्ण टके परिवार उपस्थित होता.

यावेळी सत्कारप्रसंगी बोलताना दिलीपभाई टके म्हणाले की, भूषण टके यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर तसेच प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. मोठ्या पदावर काम करण्याची मिळालेली संधी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. भूषण या संधीचे निश्चितच सोने करतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या यशाचा आम्हा संपूर्ण टके कुटुंबीयांना अभिमान आहे.

भूषण टके यांच्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांच्या रॅम्प ऑपरेशन्सची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. विमान विमानतळावर लँड झाल्यापासून ते पुन्हा टेकऑफ होईपर्यंत विमानाभोवतीच्या विविध ग्राउंड ऑपरेशन्सचे नियोजन व समन्वय साधण्याची जबाबदारी रॅम्प सुपरवायझर म्हणून त्यांना पार पाडावी लागणार आहे.

भूषण टके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नागोठणे विभाग नाभिक समाज तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!