साखरचौथ गणपती दर्शनासह सायबर क्राईमवर जनजागृती
सपोनि रविंद्र पारखे यांचा वरवठणे ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांनी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन साखरचौथ गणरायाचे दर्शन घेतले. याच अनुषंगाने मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री वरवठणे गावातील गणेश आळी येथील गणेशोत्सव मंडळाच्या साखरचौथ गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सपोनि रविंद्र पारखे यांनी उपस्थित ग्रामस्थ, तरुण व महिला वर्गाला सायबर क्राईमपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास राजिप सदस्य सुमितदादा काते, सपोनि रविंद्र पारखे यांच्यासह पोलीस हवालदार महेश लांगी, स्वप्निल भालेराव, सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत लक्ष्मण म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर, साहिल अशोक म्हात्रे,राजिप सदस्य सुमितजी काते यांचे कट्टर समर्थक संजय कणघरे, मंदार कोतवाल, राज दुर्गावले, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश दांडेकर, परशुराम बैकर, राज पाटील, उमेश पाटील, सुरेश करजेकर, प्रथमेश करजेकर, सुहास दांडेकर, मनोज करजेकर, तसेच साक्षी बैकर, रुचिता माळी, साधना वारगे, रेवती पाटील, शर्मिला म्हात्रे यांच्यासह वरवठणे ग्रामस्थ, तरुण व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि रविंद्र पारखे म्हणाले की, आज प्रत्येक नागरिक आपल्या मौल्यवान वस्तू व पैसे सुरक्षित ठेवण्याबाबत जागरूक झाला आहे. नागरिक आपले पैसे व दागिने बँकेत ठेवत असल्याने घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी चोरांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे चोरट्यांनीही आता आपली कार्यपद्धती बदलली असून मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ते पुढे म्हणाले की, सायबर क्राईम म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करून पैसे लुटणे होय. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला ओटीपी, एटीएम पिन, बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन सपोनि पारखे यांनी केले.
सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून, बँक अधिकारी किंवा इतर प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून कशा पद्धतीने फसवणूक करतात, याची उदाहरणांसह माहिती देत सपोनि रविंद्र पारखे यांनी उपस्थित ग्रामस्थांमध्ये सायबर क्राईमबाबत जनजागृती केली.
दरम्यान, गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वरवठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर यांनी सपोनि रविंद्र पारखे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुमितजी काते यांचा सत्कार केला.

