नागोठणे केंद्र प्रमुख सुनिल मोंढे यांची श्रीमती गु. रा. अग्रवाल विद्यामंदिरला भेट; शाळेच्या गुणवत्ता व व्यवस्थापनाचे केले कौतुक
नागोठणे केंद्रातील प्रत्येक शाळेची गुणवत्ता व विद्यार्थीपट वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार; शैक्षणिक प्रशासन डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचा निर्धार
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
नागोठणे येथील को. ए. सो.च्या श्रीमती गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर शाळेला नागोठणे केंद्र प्रमुख सुनिल मोंढे यांनी गुरुवार, दि. १६ जुलै रोजी भेट देऊन शाळेची तपासणी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, भौतिक सुविधा, शैक्षणिक प्रशासन आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना केंद्र प्रमुख सुनिल मोंढे यांनी नागोठणे केंद्रांतर्गत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या १६ शाळा, ४ माध्यमिक शाळा आणि २ इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता व विद्यार्थीपट वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे सांगितले.
शाळेच्या भेटीदरम्यान त्यांनी पीएम पोषण शक्ती निर्माण योजनेची दैनंदिन उपस्थिती, व्हीएसके पोर्टलवरील नोंदी, एमडीएम धान्य व इतर साहित्य स्वीकारण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासण्याबाबत आवश्यक सूचना केल्या. शाळेचा परिसर स्वच्छ असून भौतिक सुविधांचा प्रभावी वापर आणि एकूण व्यवस्थापन समाधानकारक असल्याचा अभिप्राय त्यांनी नोंदविला.
केंद्र प्रमुख सुनिल मोंढे यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य देविदास पवार यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षक आबेसिंग गावित, नेताजी गायकवाड, सौ. कांचन कोळी, परेश खंकाळ तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी संतोष गोळे उपस्थित होते.

