ओटीपी कुणालाही देऊ नका; अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका : पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांचा विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र; लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहात जनजागृती शिबिर
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) :
सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा वापर अत्यंत सावधगिरीने करावा, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, त्यांच्याशी चॅटिंग करू नका तसेच कोणालाही ओटीपी देऊ नका, असा महत्त्वपूर्ण सल्ला नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांनी दिला.
नागोठणे लायन्स क्लबच्या वतीने आयोजित सेवा सप्ताह (१ ते ८ ऑक्टोबर) अंतर्गत सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नागोठणे उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांनी विद्यार्थ्यांशी हसत-खेळत संवाद साधत सायबर गुन्हे, सोशल मीडिया वापर, ऑनलाइन फसवणूक आणि मोबाईल सुरक्षेबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कदम, नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन विलास चौलकर, नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी लियाकतकशेठ कडवेकर, लायन प्रकाश जैन, लायन यशवंत चित्रे, लायन डॉ. अनिल गिते, लायन विजय शहासने, लायन सखाराम ताडकर, लायन दीपक गायकवाड, लायन पांडुरंग शिंदे, लायन संतोष शहासने, लायन विशाल शिंदे, लायन सिद्धेश काळे, लायन विद्या म्हात्रे यांच्यासह उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मित्र आधार देणारा असावा, फसवणूक करणारा नसावा, असे सांगताना पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर चांगल्या आणि विधायक कामांसाठी करण्याचे आवाहन केले. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री करताना सावध राहा. वैयक्तिक माहिती, फोटो किंवा संवेदनशील माहिती कुणाशीही शेअर करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईल किंवा इंटरनेटवर गेम खेळताना स्वतःचे अथवा आई-वडिलांचे बँक अकाउंट, पासवर्ड किंवा इतर आर्थिक माहिती देऊ नका. ‘१, २, ३, ४’, जन्मतारीख, वाहन क्रमांक अशा सहज ओळखता येणाऱ्या क्रमांकांचा पासवर्ड म्हणून वापर करू नका आणि पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी अनोळखी एपीके (APK ) अथवा अननोन फाईल उघडू नका, अनोळखी व्यक्तींना जुना मोबाईल देताना त्यातील वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे हटवा आणि फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असे त्यांनी सांगितले.
अश्लील फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करून अनेकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या फोटो-व्हिडिओपासून दूर राहा. अश्लील फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे, याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी, असे प्रमोद कदम यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे. आपले आयुष्य सुंदर आहे, त्यामुळे सुंदर जीवन जगा,असा भावनिक संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोणतीही अडचण आल्यास आई-वडिलांचे मार्गदर्शन घ्यावे. मुलींनी आपल्या आईला व मोठ्या बहिणीला मैत्रीण समजून मनातील गोष्टी सांगाव्यात, तर मुला-मुलींनी आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना आई-वडिलांचा विश्वास व मार्गदर्शन यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
आपला देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत. शिक्षणाला महत्त्व द्या आणि देशसेवेला प्राधान्य द्या, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना देशाबद्दलची जबाबदारी आणि जागरूकतेची जाणीव करून दिली.
शेवटी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांनी लायन्स क्लब नागोठणेच्या सेवा कार्याचे कौतुक करत लायन्स क्लब अद्वितीय काम करीत असून त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे, असे गौरवोद्गार काढले.

