नवरात्रौत्सवानिमित्त नामदार अदितीताई तटकरे यांचे नागोठणे विभागातील देवी मंदिरांना भेटी
श्री जोगेश्वरी माता, मरीआई माता, पळसाई माता व आकादेवी मातेचे दर्शन घेऊन घेतले आशीर्वाद
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नामदार अदितीताई तटकरे यांनी नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, मरीआई माता तसेच नागोठणे विभागातील पळस येथील श्री पळसाई माता आणि शेतपळस येथील श्री आकादेवी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी नामदार अदितीताई तटकरे यांनी नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री जोगेश्वरी माता देवस्थान समितीचे सचिव दिलीपभाई टके व उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांच्या हस्ते नामदार अदितीताई तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर त्यांनी नागोठणे येथील मरीआई मातेचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपभाई टके यांनी नामदार अदितीताई तटकरे यांचा सत्कार केला.
पळस येथील श्री पळसाई माता मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवरामभाऊ शिंदे यांच्या वतीने नामदार अदितीताई तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर शेतपळस येथील श्री आकादेवी मातेच्या मंदिरात नामदार अदितीताई तटकरे यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शेतपळस गावातील प्रमुख ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर नामदार अदितीताई तटकरे यांनी नागोठणे विभागातील विविध देवी मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

