कोएसो घोसाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. टी. कोकरे यांनी नवागतांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत

कोएसो घोसाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. टी. कोकरे यांनी नवागतांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत

वाकणनाका (सुनिल कोकळे) दि. १५ जून : रोहा जवळील घोसाळे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या घोसाळे हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी व आठवीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नवनियुक्त मुख्याध्यापक बी. टी. कोकरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रकाश धुमाळ, मुख्याध्यापक बी. टी. कोकरे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक गजानन सुर्वे,धर्मेंद्र फुलपागरे सहाय्यक शिक्षक रोहीदास राठोड, अतुल पाडवी, दिवाळे मॅडम, हरीश बांगारे, लेखनिक शुभम शेलार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी नरेश उघडा तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक बी. टी. कोकरे म्हणाले की, “आपली शाळा ग्रामीण भागात वसलेली असून येथे सर्वसामान्य तसेच विविध सामाजिक स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकाने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवावे.”

तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरित करताना त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, विविध शासकीय योजना तसेच इतर स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा विकास करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला घोसाळे व परिसरातील इतर गावांतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात हा स्वागत समारंभ संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!