कासवाच्या चालीने वाटचाल असली तरी श्री जोगेश्वरी पतसंस्था यशाच्या दिशेने!
संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांचा विश्वास; १५ कोटींच्या ठेवी, २५ कोटींची उलाढाल — रायगड जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारण्याचा संकल्प
नागोठणे, रायगड | शामकांत नेरपगार
रायगड जिल्ह्यातील आर्थिक क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्था मर्या., नागोठणे या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी नागोठणे येथील आराधना जैन हॉलमध्ये उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील विकासाचा संकल्प व्यक्त केला
१५ कोटींच्या ठेवी; २५ कोटींची उलाढाल
“श्री जोगेश्वरी पतसंस्थेची चाल कासवाच्या चालीने असली, तरी ती यशाच्या दिशेने निश्चितपणे जात आहे,” असे सांगत किशोरभाई जैन यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सभासदांसमोर मांडली.
संस्थेच्या ठेवी १५ कोटी रुपये, तर उलाढाल २५ कोटी रुपये झाली असून, भागभांडवल ६२ लाख रुपये आणि सभासद संख्या ३२०० इतकी झाली आहे. ठेवीदारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ठेवींच्या सुमारे ४५ टक्के रकमेची गुंतवणूक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पारदर्शक कारभारामुळे ‘अ’ वर्ग कायम
गेल्या २७ वर्षांपासून संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या मेहनतीसोबतच ठेवीदार, कर्जदार आणि सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेने आजपर्यंत ‘अ’ वर्ग कायम राखला असल्याचे किशोरभाई जैन यांनी स्पष्ट केले.
“पतसंस्था म्हणजे पत नसलेल्या लोकांना उभे करणे,” हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी संस्थेच्या उद्घाटनावेळी दिलेला विचार संस्थेने ब्रीद म्हणून स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले.
“मी राजकीय क्षेत्रात काम करीत असलो तरी पतसंस्थेच्या कामकाजात राजकारण आणले नाही. पारदर्शक पद्धतीने कारभार केल्यामुळेच संस्था आज भक्कमपणे उभी आहे,” असेही जैन यांनी नमूद केले.
संकटकाळात सभासदांच्या विश्वासाची संस्था
रायगड जिल्ह्यातील काही आर्थिक संस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागला असला, तरी संकटाच्या काळात नागरिकांना आठवणारी संस्था म्हणून श्री जोगेश्वरी पतसंस्थेकडे पाहिले जाते, हे संस्थेवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे किशोरभाई जैन यांनी सांगितले.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारण्याचा संकल्प
भविष्यात संपूर्ण रायगड जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारण्याचा संकल्प असल्याचे किशोरभाई जैन यांनी व्यक्त केले. संस्थेची नियमित कर्जमर्यादा १० लाख रुपये असली, तरी योग्य व पात्र व्यक्तीच्या गरजेनुसार २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
सोने तारण कर्जाच्या बाबतीतही इतर बँकांच्या तुलनेत संस्थेचा व्याजदर कमी असून, या कर्जप्रकारात सुरक्षितता आणि गोपनीयतेला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागोठणेच्या विकासासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न
“नागोठणे परिसराच्या विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे दिल्ली, राज्य तसेच रायगड जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व आहे. नागोठणेच्या विकासाचे मोठे व्हिजन माझ्याकडे असून, खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून ते पूर्णत्वास नेणार,” असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.
नागोठणे गावाला रिलायन्स कंपनीकडून शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी लवकरच खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्जदारांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार; विमा संरक्षण वाढविणार
पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशशेठ उर्फ घिसुशेठ जैन यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कर्जदाराचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा यासाठी २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले असून, अनेक दिवंगत कर्जदारांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे अकस्मात मृत्यूच्या विमा संरक्षणात वाढ करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सभासदांना १० टक्के लाभांश
पतसंस्थेचे सचिव संजय काकडे यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सभासदांसमोर मांडला. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सभासदांना अधिकाधिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संस्थेचा व्यवसाय वाढविण्यासाठी कार्यक्षेत्र रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रात विस्तारण्याची माहितीही त्यांनी दिली.
ऋतुजा ठाकूर यांच्यासह गुणवंतांचा सत्कार
वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून नागोठणे विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. म. ता. ठाकूर यांची नात आणि नागोठणे भातगिरणी संस्थेचे माजी सभापती प्रभाकर ठाकूर यांची कन्या कु. ऋतुजा ठाकूर यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसह उच्च पदवी संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.
श्री समर्थ कृपा ग्रामीण पतसंस्थेच्या विलीनीकरणाला तत्त्वतः मान्यता
श्री जोगेश्वरी पतसंस्थेच्या कामकाजाने प्रभावित होऊन श्री समर्थ कृपा ग्रामीण पतसंस्था, शिहूचे अध्यक्ष लक्ष्मण खाडे यांनी आपल्या संस्थेचे श्री जोगेश्वरी पतसंस्थेत विलीनीकरण करण्याची विनंती केली. यावेळी संचालक मंडळाने त्यांच्या प्रस्तावाला एकमुखाने तत्त्वतः मान्यता दिली.
सत्यनारायन पूजेचे आयोजन
दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन व सौ. संगीता जैन यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. यावेळी संचालक, सभासद आणि ग्रामस्थांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

उपस्थित मान्यवर
या. सभेला श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव दिलीपभाई टके, रायगड जिल्हा नियोजन सहनियंत्रक समितीचे सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे भातगिरणी संस्थेचे सभापती सदानंद गायकर, माजी सरपंच विलास चौलकर, रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय भोसले, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ जैन, उपाध्यक्ष प्रकाशशेठ उर्फ घिसुशेठ जैन, सचिव संजय काकडे, संचालक पिंटूशेठ जैन, शैलेश रावकर, राजकुमार पिताणी, मोहन नागोठणेकर, सरपंच तथा संचालिका सुप्रिया महाडिक, विजया परमार, कल्पना टेमकर, व्यवस्थापक सुनील नावले यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

