पिठोरी मातेच्या पूजनाने नागोठणे भक्तिमय; तेरडे कुटुंबीयांचा पारंपरिक पिठोरी उत्सव उत्साहात

पिठोरी मातेच्या पूजनाने नागोठणे भक्तिमय; तेरडे कुटुंबीयांचा पारंपरिक पिठोरी उत्सव उत्साहात

हायवेनाका नागोठणे (शामकांत नेरपगार) : संततीचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठी श्रद्धेने साजरी केली जाणारी पिठोरी आमावस्या नागोठणे शहर व विभागात भक्तिमय आणि आनंदी वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी पिठोरी मातेची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. महिलांसह ग्रामस्थांनी भक्तिभावाने पिठोरी मातेचे दर्शन घेतले.

  पिठोरी आमावस्येला हिंदू धर्मपरंपरेत विशेष महत्त्व असून, संततीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी पिठोरी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही पूजा श्रद्धा, संस्कृती आणि कौटुंबिक परंपरेचे जतन करणारी मानली जाते.
             याच पारंपरिक धार्मिक भावनेतून नागोठणे बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मंगेश तेरडे यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही पिठोरी आमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगेश तेरडे व सौ. गौरी तेरडे यांनी पारंपरिक पद्धतीने पिठोरी मातेचे पूजन करून भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी तेरडे कुटुंबीयांनी धार्मिक विधी पार पाडत पिठोरी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला.

या निमित्ताने मंगेश तेरडे यांच्या निवासस्थानी मित्रपरिवार, आप्तेष्ट, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पिठोरी मातेचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांनी पूजा-अर्चा करून महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते नरेंद्रशेठ जैन, भाईसाहेब टके, भाजप प्रदेश सचिव श्रेया कुंटे, नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश शिंदे, राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, रोहा पंचायत समिती सदस्या समृद्धी कोळी, माजी सरपंच प्रकाशशेठ जैन, अतुल काळे, सुरेश जैन, प्रथमेश काळे, ग्रामपंचायत सदस्या पुनम काळे, बिपिन सोष्टे, उल्हास शिंदे, रुचिर मोरे, मोहन नागोठणेकर, प्रकाश मोरे, नितीन पत्की, संतोष कोते, गणेश जावरे, केदार कुंटे, गुड्डू मोदी, किरण काळे, राजू काळे, अजित काळे, पवन पोलसानी यांच्यासह तेरडे, शहासने व चंदणे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश तेरडे यांच्या निवासस्थानी दरवर्षी पिठोरी आमावस्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरी केली जाते. या निमित्ताने नागोठणे तसेच परिसरातील अनेक मित्रपरिवार व आप्तेष्ट आवर्जून त्यांच्या बाजारपेठेतील निवासस्थानी भेट देत पिठोरी मातेचे दर्शन घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे हा उत्सव धार्मिक श्रद्धेसोबतच आपुलकी, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव म्हणूनही अनुभवायला मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!