के.एम.जी. विभागात गणेशोत्सवाचा जल्लोष; वाजत-गाजत गणरायाची प्रतिष्ठापना
यंदा उत्सवाचे ६५ वे वर्ष; धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे शहरातील कुंभार आळी, मराठा आळी व गवळ आळी या तीन आळ्यांचा समावेश असलेल्या के.एम.जी. विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव ६५ व्या वर्षात पदार्पण करीत असून, प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विभागातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी असंख्य भक्तगण गर्दी करीत आहेत.
सोमवारी सायंकाळी के.एम.जी. विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भव्य गणरायाची मूर्ती ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गवळ आळी व मराठा आळीमार्गे कानिफनाथ मंदिरात आणण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कानिफनाथ मंदिरात गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
दरवर्षी अतिशय खेळीमेळीच्या, उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या के.एम.जी. विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही ग्रामस्थांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित केली आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे :
रविवार दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता होम मिनिस्टर व फनी गेम्स.
सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शक्ती-तुरा नाच — शाहीर संदीप भोईर विरुद्ध शाहिरा स्नेहा खोत.
मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता मंगळागौर कार्यक्रम.
बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता ऑर्केस्ट्रा — मैफिल सप्तसुरांची.
गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत विविध गुणदर्शन कार्यक्रम (गॅदरिंग).
त्यानंतर रात्री ११.३० ते १२.३० वाजेपर्यंत के.एम.जी. ग्रामस्थांच्या सहभागातून पारंपरिक ढोल नृत्य सादर करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रमोद नागोठणेकर, उपाध्यक्ष रुपेश जगताप, सेक्रेटरी संदेश जाधव, खजिनदार तुकाराम खांडेकर, सहसेक्रेटरी संतोष नागोठणेकर, सहखजिनदार गितेश पोटे, कार्याध्यक्ष विलास चौलकर, सुनील लाड, श्रीधर नागोठणेकर, कार्यवाहक विजय नागोठणेकर, संतोष चितळकर, संतोष घाग आदी पदाधिकारी तसेच के.एम.जी. विभागातील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक श्रद्धेसोबतच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याने नागोठणे परिसरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नागोठणेकर यांनी दिली.

