अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाला अन् कर्तृत्वाला तोड नाही! विद्यार्थिनींनी अहिल्यादेवींचा आदर्श विचार जोपासावा – आमदार विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर होणे ही काळाची गरज असून, विद्यार्थिनींनी त्यांच्या आदर्श विचारांचे आचरण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तेवढ्याच तोलामोलाने राज्यकारभार करणाऱ्या अद्वितीय स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. त्यांचेच पाऊलावर पाऊल ठेवून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड ही संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहे, असे प्रतिपादन आमदार विक्रांत पाटील यांनी केले.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, मुंबई प्रदेश व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने २४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विशेष सन्मान सोहळा नेरुळ (मुंबई) येथील तेरणा ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार विक्रांत पाटील बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबासह संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्यामुळे बहुजन समाजाने शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
यावेळी विधानपरिषद सदस्य म्हणून आमदार विक्रांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल खासदार रामराव वडकुते आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
खासदार रामराव वडकुते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास खासदार रामराव वडकुते, आमदार विक्रांत पाटील, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, हर्ष लॉजिस्टिक्स कंपनीचे चेअरमन सचिन बुरुंगले, भूमी अभिलेख अधिकारी उल्हास वाघमोडे, पोलीस निरीक्षक किशोर साळे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील, पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, म्हाडाचे सहाय्यक अभियंता शंकर वीरकर, जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता नवनाथ गोरड, शिवसेना कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरक, प्रसिद्ध उद्योजक रमेश गोरे, दीपक राहिज, विजय कोकरे, संदीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील धनगर, महेश, अर्चना हाके-पाटील, सायली सरक, संतोष पटकारे, संतोष ठाकूर, तानाजीराव सांगोलकर, अॅड. निवेदिता ठाकरे, किरण मार्कंड, मुकेश करवा, डॉ. अमोल सुडके, सुनील गावडे, नंदा दिडवाघ, ब्रह्मदेव दिडवाघ, अर्जुन गावडे, कल्पना मोटे आदींना विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रा. एन. पी. खरजे यांनी मानले.

