इंदरदेव आदिवासी वाडीतील अंतर्गत रस्त्याचे काम उत्कृष्ट; तर केवळ राजकीय द्वेषातून खोटे आरोप

इंदरदेव आदिवासी वाडीतील अंतर्गत रस्त्याचे काम उत्कृष्ट; तर केवळ राजकीय द्वेषातून खोटे आरोप

रोहा (प्रतिनिधी): रोहा तालुक्यातील धामणसई ग्रामपंचायत हद्दीतील इंदरदेव आदिवासी वाडी येथे करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्याच्या कामाबाबत काही माध्यमांमध्ये करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसून वैयक्तिक राग, राजकीय द्वेष आणि स्वार्थी हेतूने प्रेरित असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समोर आली आहे.

          रोहा शहरापासून सुमारे पाच किलोमीटर आणि धामणसई गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील उंच डोंगराळ भागात विकासापासून कोसो दूर असलेल्या या आदिवासी वाडीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. विशेषतः उन्हाळ्यात येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने कोणतेही बांधकामाचे काम करणे कठीण ठरते.

          अशा प्रतिकूल परिस्थितीत संबंधित ठेकेदाराने धामणसई येथून टँकरद्वारे पाणी आणून अतिरिक्त आर्थिक खर्च करत रस्त्याचे काम पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे या कामात स्थानिक गावकरीच गवंडी व मजूर म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामस्थांचा थेट सहभाग आणि देखरेख होती अशीही माहिती मिळाली.

(इंदरदेव आदिवासी वाडीतील अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याचे काम शासकीय निकष वापरून करण्यात आले. या रस्त्यावर समाधानाने बसलेला ग्रामस्थ)

येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेला गावातील इतर ग्रामस्थांचा पाठिंबा नसून, संपूर्ण वाडीतील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यामुळे आदिवासी बांधवांची गावांतर्गत फिरण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली असून विद्यार्थ्यांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            दरम्यान, संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी अभियंत्यांनी केली असून काम निर्धारित निकषांनुसार व समाधानकारक दर्जाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

          तसेच स्थानिक नागरिकांचे मत आहे की विकासकामांना राजकीय रंग देण्याऐवजी दुर्गम भागातील नागरिकांच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे.

       “दुर्गम आदिवासी वाडीत पाणीटंचाई, डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्री असतानाही काम पूर्ण करणाऱ्या ठेकेदाराने विकासासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!