जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांच्या प्रयत्नांना यश; अखेर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर रुजू होणार

जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांच्या प्रयत्नांना यश; अखेर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर रुजू होणार

वाकणनाका (सुनिल कोकळे)दि.३ जुलै- गेल्या अनेक महिन्यांपासून नागोठणेकरांच्या आरोग्याशी संबंधित असलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रिक्त पदाचा प्रश्न सुमित काते यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे नागोठणे व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जारी केले आहेत.

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी १५ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार डॉ. गंगाधर विश्वनाथ कल्याणकर (एम.बी.बी.एस.) यांची ११ महिन्यांच्या कंत्राटी कालावधीसाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांनी आदेश प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत रुजू होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी रोहा, पेण किंवा अलिबाग येथे जावे लागत होते. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे मोठे हाल होत होते. या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांनी जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता नागोठणे व परिसरातील हजारो नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे दैनंदिन रुग्णसेवा, आपत्कालीन उपचार तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळा सुरु झाला असून या कालावधीत अनेक रुग्ण या दवाखाण्यात उपचारासाठी येत असतात. आम्ही वैद्यकीय अधिकारी यांना संपूर्णपणे सहकार्य करून अधिक चांगल्या प्रकारे उपचार व औषधोपचार कसा मिळेल याची काळजी घेवू असेही सुमितदादा काते यांनी स्पष्ट केले आहे.नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!