खा. सुनील तटकरेंच्या दणक्याने एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे उजळले
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार ) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागोठण्यातील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे खासदार सुनील तटकरे यांच्या दणक्याने उजळले आहेत. संध्याकाळ पर्यंत पथदिवे सुरू करा आणि त्याचा निरोप मला लगेच पाठवा अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना शनिवारी (दि.३) दुपारी ठणकावले होते. त्याची दखल घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील पथदिवे तातडीने सुरू केले आहेत.
त्यामुळे शासकीय यंत्रणेवर खासदार सुनील तटकरे यांच्या असलेल्या दराऱ्याचे सर्वत्र कौतुक होत असून पथदिवे सुरू झाल्याने नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.
नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजने संदर्भात नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयातील नियोजित बैठकीपूर्वी फिल्टर प्लांटच्या ठिकाणी भेट देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी फिल्टर प्लांटकडे जात असताना एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे खूप कालावधीपासून बंद असल्याचे स्थानिक नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पथदिवे बंद असल्याने सकाळच्या वेळी या रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी जाणारे नागरिक, गुरे चरावयास येणारे शेतकरी, गुराखी, रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेतावर जाणारे शेतकरी, महिला यांना दररोज पहाटेच्या वेळी तसेच सायंकाळी काळोखातून चालत जावे लागत होते. पायी चालत असताना सर्वांच्या मनात वेगळ्या प्रकारची भीती निर्माण होत असे. या सर्व बाबी स्थानिक नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील पथदिवे तातडीने सुरू करण्याची तंबी दिली होती. त्याचीच दखल घेत हे पथदिवे तांत्रिक दोष दूर तातडीने करून सुरू करण्यात आल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

