विठ्ठल नामाच्या गजराने मेहेंदळे हायस्कूल दुमदुमले श्री विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेसह वृक्षदिंडीचे आयोजन

विठ्ठल नामाच्या गजराने मेहेंदळे हायस्कूल दुमदुमले;श्री विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेसह वृक्षदिंडीचे आयोजन

वाकणनाका(सुनिल कोकळे)दि.२४ जुलै
रोहा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याचे व वृक्षदिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. “विठ्ठल… विठ्ठल…” नामाच्या अखंड गजराने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.

यापालखी सोहळ्याचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य रमेश मोसे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नारायण पानसरे, संग्राम गायकवाड तसेच अन्य शिक्षक उपस्थित होते.

               यावेळी आयोजित केलेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करत पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी विठ्ठलाचे अभंग व भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले.
यावेळी प्राचार्य रमेश मोसे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी, वारकरी संप्रदाय आणि दिंडी परंपरेचे महत्त्व सांगितले. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत, वृक्ष लावून त्याचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केली.
                या पालखीची सुरुवात मेहेंदळे हायस्कूल येथून करण्यात आली व परिसरातून पालखी दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, भगवे झेंडे तसेच तुळशी वृंदावन घेऊन पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदविला. दिंडीदरम्यान पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
              या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका दर्शना म्हात्रे, मनिषा निमन, अस्मिता तेंडुलकर, सहाय्यक शिक्षिका रिमा पाटील, शिक्षक विशाल सोनकर, मंगेश गिरी, सुनिल कोकळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!