नागोठण्यात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ग्राहक त्रस्त वारंवार वीजपुरवठा खंडित; वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य ग्राहक हैराण

नागोठण्यात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ग्राहक त्रस्त

वारंवार वीजपुरवठा खंडित; वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य ग्राहक हैराण

नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे शहर व परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीज बिले, मीटर रीडिंगमधील कथित चुका आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागोठणेकरांकडून होत आहे.

• दररोज तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित

नागोठणे परिसरात दररोज जवळपास तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरगुती ग्राहकांसह महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वीजेवर अवलंबून असलेल्या छोट्या व्यवसायांवरही याचा विपरीत परिणाम होत असून, वारंवार वीज खंडित झाल्याने व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

•वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना भुर्दंड

वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच वाढीव वीज बिलांची समस्याही ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मीटर रीडिंग योग्य पद्धतीने न घेतल्यामुळे काही ग्राहकांना अचानक पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतची बिले आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी एवढे मोठे वीज बिल कसे भरायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मीटर रीडिंगचे काम ज्या एजन्सीला देण्यात आले आहे, त्या एजन्सीकडून योग्य रीडिंग घेतले जाते की नाही, याची वीज वितरण कंपनीने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

• चुकीच्या रीडिंगची चौकशी करण्याची मागणी

चुकीच्या मीटर रीडिंगमुळे वाढीव बिल आकारले गेले असल्यास त्याची जबाबदारी संबंधित एजन्सीवर निश्चित करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन बिलांबाबत योग्य ती पडताळणी करण्याची मागणीही जोर धरत आहे.

• उपअभियंत्यांच्या कथित उद्धट वर्तनाबाबत नाराजी

दरम्यान, नागोठणे येथील वीज वितरण कंपनीच्या उपअभियंत्यांकडून ग्राहकांशी कथितपणे उद्धटपणे वागले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “कोर्टात जा, कुठेही जा; बिल कमी होणार नाही,” अशा प्रकारे ग्राहकांना उत्तर दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्राहकांच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्यांना धमकीच्या स्वरूपात उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

• पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित केल्याची तक्रार

वीज बिल वेळेवर न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रारही ग्राहकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब व सर्वसामान्य ग्राहकांवर मानसिक व आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

•महामार्गालगत अनधिकृत केबल कामांचा आरोप

मुंबई-गोवा महामार्गालगत नागोठणे परिसरात इंटरनेट व वाय-फाय केबल टाकण्याचे काम कथितपणे अनधिकृतरीत्या सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामादरम्यान वीजवाहिन्यांना अथवा केबलला वारंवार धक्का लागून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या कथित अनधिकृत कामांवर संबंधित विभागाकडून कारवाई का केली जात नाही? संबंधित काम करणाऱ्यांना कोणाचे पाठबळ आहे? असा सवाल नागोठणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. इमानेइतबारे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अशा प्रकारच्या कामांचा नाहक त्रास का सहन करावा लागतो, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

• उपअभियंत्यांच्या बदलीची मागणी

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीज बिले, मीटर रीडिंगच्या तक्रारी आणि ग्राहकांशी कथित उद्धट वर्तनामुळे नागोठणेकरांमध्ये वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

त्यामुळे नागोठणे येथील उपअभियंत्यांची तातडीने बदली करून ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

•वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी

वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागोठणे परिसरातील वीजपुरवठा, मीटर रीडिंग, वाढीव वीज बिले तसेच कथित अनधिकृत केबल कामांची तातडीने चौकशी करावी. दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागोठणेकरांकडून जोर धरत आहे.

नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता नागोठणेकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!