मिरानगर उड्डाणपुलाच्या अभियंत्यांच्या घरांची झडती घेऊन ईडी लावा! राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सरकारकडे मागणी; ‘पुलाचे डोहाळे जेवण’ आंदोलनाने नागोठणे दणाणले

मिरानगर उड्डाणपुलाच्या अभियंत्यांच्या घरांची झडती घेऊन ईडी लावा!

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सरकारकडे मागणी; ‘पुलाचे डोहाळे जेवण’ आंदोलनाने नागोठणे दणाणले

नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मिरानगर, नागोठणे येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तसेच पुलाला तडे गेल्याचा आणि पुलाचे ‘पोट फुगल्याचा’ आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अनोख्या पद्धतीने ‘पुलाचे डोहाळे जेवण’ आंदोलन करण्यात आले. रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने नागोठणे परिसराचे लक्ष वेधून घेतले.

या आंदोलनादरम्यान मिरानगर नागोठणे उड्डाणपुलाच्या कामात कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, “पुलाचे काम करणाऱ्या अभियंत्यांच्या घरांची झडती घेऊन ईडीची कारवाई करावी,” अशी मागणी रविंद्र चव्हाण यांनी सरकारकडे केली. तसेच “नागोठणे उड्डाणपूल पुन्हा बांधा, पुलाखालून पिलर टाका आणि त्याशिवाय हा पूल वाहतुकीसाठी खुला करू नका,” अशी मागणीही त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी महाराष्ट्र शासन व संबंधित ठेकेदारांना दिला.

महिलांनी भरली पुलाची ओटी

आंदोलनाच्या माध्यमातून मिरानगर उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा, बांधकामातील कथित त्रुटी आणि जनतेच्या पैशांचा कथित अपव्यय याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी महिलांनी अनोख्या पद्धतीने पुलाची ओटी भरून ‘डोहाळे जेवण’ आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी उपरोधिक पद्धतीने “कुणीतरी येणार गं, येणार गं… कोकणातील हायवे कधी होणार गं, कधी होणार गं…” हे गाणे सादर करत सरकारच्या कामकाजावर टीका केली.

यावेळी ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार जिंदाबाद’, ‘भारत माते की जय’, ‘महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो’, ‘तानाशाही नही चलेगी’, ‘भ्रष्टाचार नही चलेगा’ अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले.

१८ वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या १८ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असून अद्यापही हा महामार्ग पूर्णत्वास गेलेला नाही. महामार्गावर झालेली अनेक कामे आणि उड्डाणपूल निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

मिरानगर नागोठणे उड्डाणपुलाच्या बांधकामात चिंध्या, घाण व कचरा टाकण्यात आल्याचा आरोप करत या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला. “जे काम १०० रुपयांचे आहे, ते १० लाखांपर्यंत गेले असून काम वाढत गेले, तशी टक्केवारीही वाढत गेली,” असा आरोप त्यांनी केला.

ठेकेदार-अभियंत्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

ठेकेदार आणि अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचा आरोप करत रविंद्र चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मिरानगर उड्डाणपुलाच्या कथित निकृष्ट कामाला अभियंता व ठेकेदारांसोबतच संबंधित मंत्री, खासदार व आमदारही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

“लोकशाहीमध्ये सरकारची कथित तानाशाही चालू देणार नाही,” असे सांगत चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

‘काचेच्या पट्ट्या व एमसील’च्या कामावर सवाल

उड्डाणपुलाच्या भिंतींना काचेच्या पट्ट्या व एमसील लावण्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख करत “हे काम करण्यामागे ठेकेदाराचा नेमका उद्देश काय?” असा सवालही रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला. पुलाच्या मूळ बांधकामातील त्रुटी दूर करण्याऐवजी बाह्य स्वरूपाच्या कामावर भर का दिला जात आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सज्जादभाई डावरे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीहर्ष कांबळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सदानंद येळवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अजयशेठ महाडिक, अलिबाग विधानसभा अध्यक्ष सचिन पाटील, विधानसभा सरचिटणीस साईनाथ म्हात्रे, माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर, जिल्हा महिला संघटक रिया रेडेकर, अनिता पवार व त्यांच्या महिला सहकारी, सुधागड तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, गोरेगाव शहर अध्यक्ष अस्लम भऊर, पोलादपूर विभागीय अध्यक्ष भावेश सलागरे, दहिवली विभाग अध्यक्ष सलाउद्दीन सणगे, रोहा तालुका युवक अध्यक्ष मुजाहिद मुजावर, गुड्डू पानसरे, राहील कडवेकर, मिर्जा कुटकी, आलम खान, असिफ शेख, वसीम कडवेकर, शबाब पेणकर, मुशीद कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!