श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी ८ सप्टेंबर रोजी
श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नागोठणे, रायगड (शामकांत नेरपगार) : सालाबादप्रमाणे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी नागोठणे येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. नाभिक समाजाचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ९ ते ९.३० वाजता कळस पूजन महेंद्र पवार व सौ. मानसी महेंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते ११ वाजता संत सेवा मंडळ नागोठणे पंचक्रोशी यांचे भजन होणार आहे. सकाळी ११ ते १२ वाजता ह.भ.प. श्री. शुभाष महाराज शेळके (सांबरी) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले असून, हे प्रवचन श्रीनिवास नरेंद्र जाधव यांच्या सौजन्याने होणार आहे.
दुपारी १२ ते १ वाजता विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १ ते २.३० वाजता महाप्रसाद मनोज मारुती गायकवाड यांच्या सौजन्याने, तसेच मिश्रान्न नितीन माने यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ३ ते ५ वाजता महिलांचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते ८ वाजता संत सेवा मंडळ नागोठणे यांच्या वतीने हरिपाठ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पुष्पहार अॅड. रमेश जाधव यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.
या पुण्यतिथी सोहळ्यास सर्व नाभिक समाज बांधव-भगिनींनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाभिक समाज नागोठणे विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष मिलिंद गुजर, कार्याध्यक्ष शैलेश रावकर, शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर, खजिनदार रविंद्र टके, सचिव दिगंबर खराडे, तसेच कार्यकारिणी सदस्य शामकांत नेरपगार, महेंद्र माने, मंगेश गायकवाड, अॅड. श्रीकांत रावकर, अॅड. रमेश जाधव, राकेश शिर्के, संदीप जाधव, रुपेश साळुंखे आणि महिला अध्यक्षा कल्पना हरीश टके यांच्यासह नागोठणे विभाग नाभिक संघ, महिला आघाडी तसेच संत सेवा मंडळ नागोठणे परिश्रम घेत आहेत.

