नीलिमाताई डावखरे यांचा माणगाव तालुका दौरा यशस्वी
शैक्षणिक संस्था, आयटीआय तसेच विकासकामांना दिली भेट; कार्यकर्त्यांशी साधला संवाद
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) – : कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी तथा भाजप महिला नेत्या सौ. नीलिमाताई डावखरे यांचा माणगाव तालुका दौरा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्घाटन, शैक्षणिक संस्थांना भेटी तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.
या दौऱ्यादरम्यान मौजे सुराव तर्फे निजामपूर येथे गणेश विसर्जन घाट बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच माणगाव येथील गं. रा. मेहता विद्यालयास भेट देऊन तेथील विविध विषयांची माहिती जाणून घेण्यात आली.
निजामपूर येथे मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली. तसेच माणगाव नगरपंचायतीमध्ये ई-लायब्ररी संच व सोलर यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विविध विकासकामांबाबत पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांशी चर्चा करण्यात आली.
निजामपूर येथील आयटीआय महाविद्यालयाला भेट देताना सौ. नीलिमाताई डावखरे यांनी विविध ट्रेडच्या प्रशिक्षणाची पाहणी केली. प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या इन्स्ट्रुमेंट्सची कमतरता याबाबत त्यांनी शिक्षकवर्गाशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे आणि आवश्यक साधनसामग्रीअभावी त्यांच्या प्रशिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या दौऱ्यात भाजप शिक्षण सेल रोहा तालुका अध्यक्ष अशोक अहिरे, युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्यासह मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, निलेश थोरे व अशोक अहिरे यांनी आमदार निरंजन डावखरे यांचे स्वीय सहाय्यक अजितकुमार पांडव यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून सदर दौरा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

