महामार्गावरील मार्ग बंद; मुरावाडी गावासह सात गावांतील तीन हजार ग्रामस्थांचे हाल : विद्यार्थी, शेतकरी व नागरिक त्रस्त; मार्ग तात्काळ खुला न केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी तसेच कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगाव, कोंडगाव आदिवासीवाडी, कातळावाडी, पायरवाडी, तलईवाडी, भपक्याची वाडी, एकलघर आदी गावांतील जवळपास तीन हजार ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी वापरला जाणारा जवळचा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनी कल्याण टोलच्या अधिकाऱ्यांनी बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मार्ग बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना नागोठण्याहून आपल्या गावात जाण्यासाठी निडी नाक्यापर्यंत सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांसह शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शेतकरी वर्गालाही या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे. अनेक शेतजमिनी महामार्गाच्या पलीकडे असल्याने शेतीची अवजारे, गुरेढोरे तसेच इतर साहित्य ने-आण करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या लावणीचा हंगाम सुरू असताना मार्ग बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
या प्रश्नाबाबत शिंदे शिवसेनेचे नागोठणे विभागप्रमुख प्रविण ताडकर, निष्ठावंत शिवसैनिक विजय धामणे, ज्येष्ठ ग्रामस्थ एकनाथ राजीवले, नामदेव ताडकर, शशिकांत चोगले, मनोहर ताडकर व अमोल ताडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत ग्रामस्थांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. पूर्वीप्रमाणे मार्ग तात्काळ खुला करण्यात यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिंदे शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख प्रविण ताडकर यांनी दिला.
यावेळी त्यांनी उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचाही मुद्दा उपस्थित केला. उड्डाणपुलाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने त्यावरील वाहतूक बंद करून सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच खराब अवस्थेतील सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा अतिरिक्त भार पडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून ग्रामस्थांना त्याचाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रविण ताडकर यांनी सांगितले की, सन २०२४ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्ग ठेकेदारांना हॉटेल गोविंदसमोरील ठिकाणी मुरावाडीसह सात गावांतील ग्रामस्थांच्या ये-जा करण्यासाठी सुमारे ३० मीटरचा दुभाजक खुला ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सन २०२५ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना हा मार्ग कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या.
तरीदेखील महामार्ग ठेकेदार आणि संबंधित अधिकारी वर्गाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ग्रामस्थांची गैरसोय कायम ठेवली असल्याचा गंभीर आरोप शिंदे शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख प्रविण ताडकर यांनी केला. ग्रामस्थांच्या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन पूर्वीप्रमाणे मार्ग खुला करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

