राष्ट्रीय समाज पक्षाच्या मध्य रायगड भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक कोकळे यांची नियुक्ती
नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – राष्ट्रीय समाज पक्षाच्या मध्य रायगड भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुकेळी (ता. रोहा) येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक विठ्ठल कोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली.
अशोक कोकळे यांचे सामाजिक कार्य, पक्षावरील निष्ठा, संघटन कौशल्य तसेच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी असलेली तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करणे, नवीन सदस्य नोंदणी व सक्रिय सदस्य वाढविणे, पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, सर्व समाजघटकांशी समन्वय साधणे तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करावे, अशा अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केल्या आहेत.

ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास नियुक्तीत बदल अथवा रद्द करण्याचा अधिकार पक्ष नेतृत्वाकडे राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अशोक कोकळे यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

