जिल्हा परिषदेच्या ताकदीचा उपयोग महिला भगिनींसाठी करणार : वैकुंठदादा पाटील
जिल्ह्यातील महिलांसाठी लवकरच दोन अभिनव योजना
सर्वांगिनी महिला प्रभाग, नागोठणे यांची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार ) : रायगड जिल्हा परिषदेने आमच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून दोन अभिनव योजना आणल्या आहेत. पशुसंवर्धन खात्यातून जिल्ह्यातील २० हजार महिलांना १०० पिलांची कुक्कुटपालन योजना तर कृषी खात्याच्या माध्यमातून १५ हजार महिलांना भाजीपाला किटचे वाटप या दोन योजना आम्ही येत्या दोन महिन्यांत मार्गी लावणार आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी विविध योजना आणून नारीशक्तीला ताकद देत आहेत. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक महिला विराजमान आहे. त्यामुळेच महायुती सरकारच्या मागे महिला खंबीरपणे उभ्या आहेत. आम्ही सुद्धा रायगड जिल्हा परिषदेतील ताकदीचा उपयोग महिला भगिनींसाठी करून, महिला शक्तीला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचे काम नेहमीच करणार आहोत असे अभिवचन रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती वैकुंठदादा पाटील यांनी नागोठणे सर्वांगिनी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिला भगिनींना दिले.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती रोहा अंतर्गत सर्वांगिनी महिला प्रभाग संघ, नागोठणे यांच्या
नागोठण्यात मंगळवारी (दि.८) सकाळी संपन्न झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला वैकुंठदादा पाटील, रोहा रजिपच्या माजी उपाध्यक्षा निलिमाताई पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शर्मिलाताई पाटील, पंचायत समितीच्या सभापती विजयाताई पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, भाजपा राज्य सचिव श्रेया कुंटे, रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमृता उंद्रे–पाटील, सदस्या समृद्धी कोळी, अरुणा हंबीर, दिशा समितीचे सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे , तालुका महामंत्री एकनाथ ठाकूर,राजेंद्र लवटे,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्षा अपर्णा सुटे, सचिन ठोंबरे, पूनम काळे, शबाना मुल्ला, अशा शिर्के, सर्वांगिनी महिला प्रभाग संघाच्या समन्वयक नेहा पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक अक्षय खंदारे, प्रभाग संघाचे अध्यक्ष राजश्री दाभाडे, कोषाध्यक्ष स्मिता ताडकर, सचिव मोनिका आवाद, लेखापाल कृतिका कदम, वर्षा जांबेकर, निष्ठा विचारे, दीपेश्री घासे आदींसह नागोठणे प्रभागातील बचत गटांच्या महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सर्वांगिनी महिला प्रभाग संघाच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रस्ताविक संघाच्या अध्यक्षा राजश्री दाभाडे यांनी केले तर लेखापाल कृतिका कदम यांनी वार्षिक अहवाल सादर केला. या सभेच्या निमित्ताने रोहा पंचायत समितीच्या सभापती विजयाताई पाशीलकर यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आज एकजुटीची ताकद दाखविल्याचे सांगून महिलांना प्रोत्साहित केले. निलीमाताई पाटील यांनी आपल्या मनोगतात बचत गट हे सर्वांना उपयोगी पडत असून अडचणीच्या काळात कुटुंबाच्या संसाराला आधार देत असल्याचे सांगितले. शर्मिलाताई पाटील म्हणाल्या की, बचत गटामुळे स्त्री शक्तीच्या जागृतीची आणि एक नवीन पर्वाची सुरुवात झालेली आहे. रोहाचे उपसभापती संजय मांडलुस्कर यांनी आपल्या मनोगतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ज्याप्रमाणे महिलांसाठी विविध योजना आणत आहेत. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातही खासदार सुनील तटकरे साहेब मंत्री आदिती ताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे महिलांना सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इच्छापूर्ती ग्रामसंघ बाळसई, यांच्या महिलांनी उत्कृष्ट लेझीम खेळून पाहुण्यांचे स्वागत केले तर चैतन्य ग्रामसंघ, भिसे यांच्या महिलांनी मंगळागौरी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यास उपस्थित महिलांनी भरभरून दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम राकेश शिंदे यांनी केले. ही सभा यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामसखी, सर्व ग्रामसंघ पदाधिकारी, लेखापाल व समूह सदस्य यांनी सहकार्य केले.

