पोट फुगलेल्या नागोठण्यातील उड्डाण पुलाचे “डोहाळे जेवण” राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा

पोट फुगलेल्या नागोठण्यातील उड्डाण पुलाचे “डोहाळे जेवण”
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ११ सप्टेंबरला नागोठण्यात आगळे वेगळे आंदोलन

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार ) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागोठण्यातील पुलाला तडे गेल्याच्या व पुलाचे पोट फुगल्याच्या पार्श्वभूमीवर ‘पुलाचे डोहाळे जेवण’ हा उपरोधिक कार्यक्रम शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नागोठणे पुलावर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

नागोठण्यातील पुलाच्या कामाचा दर्जा, बांधकामातील कथित त्रुटी आणि जनतेच्या पैशाचा झालेला अपव्यय याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पुलाचे काम करणारी कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री, खासदार, आमदार तसेच कामाच्या दर्जाबाबत जबाबदार असलेल्या अभियंत्यांना या डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुलाच्या कामाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “जनतेच्या पैशाचे वाटोळे करून अखेर जनतेच्या हाती धुपाटणे आले आहे. पुलाच्या कामातील कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराचा जाब संबंधितांकडून विचारला गेला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पुलाच्या कामाची गुणवत्ता, अभियंत्यांची जबाबदारी आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीबाबत सखोल चौकशी करण्याची मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सदर पुलाला बाळंतपणाच्या कळा लागल्यामुळे अवजड वाहतूक सर्विस रोडवर वळविण्यात आली आहे. दरम्यान, पुलाच्या संरचनेत समस्या निर्माण झाल्याने जड वाहनांची वाहतूक या पुलावरून बंद करून सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पुलावरून हलकी वाहने सोडण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे समजते. पेपर फुटीतून आलेले अभियंता, व भ्रष्टाचारी नेते यांचं या उड्डाणपूलने बिंग फोडलं अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!