रोहा तालुक्यात राष्ट्रवादीची संघटना मजबूत करण्यासाठी महेंद्र पोटफोडे सज्ज : नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा नागोठण्यात सत्कार कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी उभा राहीन – महेंद्र पोटफोडे

रोहा तालुक्यात राष्ट्रवादीची संघटना मजबूत करण्यासाठी महेंद्र पोटफोडे सज्ज : नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा नागोठण्यात सत्कार

कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी उभा राहीन – महेंद्र पोटफोडे

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : लोकनेते रायगडचे खासदार सुनील तटकरे, नामदार अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे खांब-कोलाड विभागातील निष्ठावंत व कष्टाळू कार्यकर्ते महेंद्र पोटफोडे यांची रोहा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांच्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी व ओळख-परिचयाच्या कार्यक्रमाची सुरुवात नागोठणे येथून करण्यात आली.

                राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागातील नेते दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी नागोठणे शहर व विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

                यावेळी नागोठणे शहर व विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे, नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, विलास चौलकर, लियाकतशेठ कडवेकर, संजय भोसले, नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ काळे, चंद्रकांत गायकवाड, हरीश टके, मनोहर सुटे, हिराजी शिंदे, जुगनशेठ जैन, राजेंद्र शिंदे, प्रमोद जांबेकर, निवास पवार, महेंद्र हंबीर, मनोज टके, प्रथमेश काळे, चेतन टके, अॅड. श्रीकांत रावकर, अॅड. रमेश जाधव, मंगेश तेरडे, दिलीप आवाद, बिपीन सोष्टे, रुचिर मोरे, प्रकाश कांबळे, धनंजय जगताप, भारत भोय, दिगंबर खराडे, रविंद्र टके, महेंद्र पवार, सुधाकर निंबाळकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

              यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महेंद्र पोटफोडे म्हणाले की, आपले नेते खासदार सुनील तटकरे, नामदार अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे मी निश्चितच सोने करणार आहे. प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा व समस्या खासदार सुनील तटकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम मी करणार आहे. खासदार सुनील तटकरे, नामदार अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांच्या समस्या पोहोचविण्यासाठी मी मधला दुवा म्हणून काम करेन. पक्षातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन माझ्या कार्याला सुरुवात करीत आहे. रोहा तालुक्यातील प्रत्येक भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी इमानेइतबारे काम करणार असून, आता नव्याने संघटना उभी करायची आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी व विविध समस्या सोडविण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही महेंद्र पोटफोडे यांनी दिली. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या नागोठणे विभागातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के यश मिळविण्यासाठी आतापासूनच जोमाने काम करण्यास सज्ज राहूया, असे आवाहनही महेंद्र पोटफोडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

            यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, निष्ठावंत कार्यकर्त्याची एखाद्या पदावर निवड झाली की पक्ष संघटना निश्चितच अधिक मजबुतीने बांधली जाते. महेंद्र पोटफोडे यांच्या रूपाने आपल्याला एक तरुण, कष्टाळू व निष्ठावंत पदाधिकारी मिळाला आहे. राजकारणात मते मिळविण्यापूर्वी मने जिंकणे महत्त्वाचे असते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचा झेंडा हातात घेऊन तळागाळात काम करावे लागते,असे मौलिक मार्गदर्शन किशोरभाई जैन यांनी केले. यावेळी नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, नेते सदानंद गायकर, शिवरामभाऊ शिंदे, संजय भोसले आदींनी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!