गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत रायगडच्या विद्यार्थ्यांचा गौरव; सुतारवाडीच्या गुरुदत्त ढाकणेचा राज्यात द्वितीय क्रमांक
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा गुणगौरव सोहळा नुकताच ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल, खांब (ता. रोहा) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन रविंद्र लोखंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील तालुकास्तरावरील ७० व जिल्हास्तरावरील ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, रजिप शाळा, सुतारवाडी (ता. रोहा) येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कु. गुरुदत्त बाबासाहेब ढाकणे याने गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याचा विशेष सत्कार रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड आणि प्रायव्हेट हायस्कूल, पेण या दोन शाळांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बबन निरगुडा (न्यू इंग्लिश स्कूल, कळंबोली), सरोज जितेकर (सीकेटी इंग्लिश मीडियम हायस्कूल, न्यू पनवेल) आणि विनोद पन्हाळकर (न्यू इंग्लिश स्कूल, जोहे, ता. पेण) या तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना वैकुंठशेठ पाटील म्हणाले की, गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेचा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष किराण चोगले यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक अशोक अहिरे व त्यांच्या टीमकडून उत्कृष्टपणे राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधून त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, यापूर्वी अशा प्रकारचे कार्य क्वचितच झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक व संशोधनप्रधान युगात विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जागरूकता आणि अभ्यासातील नवनवीन पद्धती आत्मसात केल्यास त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल. गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठशेठ पाटील, गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किराण चोगले, समन्वयक अशोक अहिरे, ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन रविंद्र लोखंडे, भाजप रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, महिला तालुका अध्यक्षा अपर्णा सुटे, तालुका उपाध्यक्ष कल्पेश माने, वर्षी जांबेकर, नेल्सन मंडेला स्कूल, नागोठणेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

