नागोठण्यात अतिक्रमणावर अखेर प्रशासनाचा हातोडा
ग्रामपंचायत-पोलिसांच्या संयुक्त कारवाईला सुरुवात
नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – : नागोठणे शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अरुंद जागा आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नागोठणे ग्रामपंचायत व नागोठणे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या अतिक्रमण हटाव मोहिमेप्रसंगी सरपंच सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, भाविका गिजे, ज्योती राऊत, विनिता पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नागोठणे शहरातील रस्ते व सार्वजनिक जागांवर दुकानदार, गाळेधारक तसेच टपरीधारकांकडून करण्यात आलेले अतिक्रमण स्वतःहून हटवून प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन करण्यात आल्या होत्या. नोटीस देऊनही अतिक्रमण न हटविल्यास शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी दिला होता. त्यानुसार शनिवारपासून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून विशाल मेडिकल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातून कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रस्त्यालगतचे अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार व टपरीधारकांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, सोमवार, दि. ३१ ऑगस्टपासून ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढील भागातील अतिक्रमण केलेले दुकानदार, गाळेधारक व टपरीधारक यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण हटवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी केले आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून सार्वजनिक हितासाठी आहे. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत होणे आणि शहरातील रस्ते मोकळे राहणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश आहे. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी केले.

