दहीहंडी उत्सवात ‘नशामुक्ती’चा संदेश; नागोठणे पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक व युवकांची उपस्थिती लक्षात घेऊन नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांनी नागोठणे पोलिस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थांच्या सेवन व गैरवापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी ‘अंमली पदार्थांपासून दूर राहा’ तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणारे जनजागृतीपर फ्लेक्स व बॅनर लावण्यात आले होते. या माध्यमातून विशेषतः युवकांना अंमली पदार्थांच्या आहारी न जाता निरोगी व व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. दहीहंडीच्या उत्सवी वातावरणात पोलिसांनी राबविलेल्या या जनजागृती उपक्रमातून ‘उत्सव साजरा करा, मात्र नशेपासून दूर राहा’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.
या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, युवकांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

