नागोठणेच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयातून प्रशासकीय गती! खा. सुनील तटकरे यांच्या सूचनेनंतर उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नवीन प्रस्तावासह जॅकवेल व फिल्टर प्लांटजवळ सोलर सिस्टीम उभारणार

नागोठणेच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयातून प्रशासकीय गती!

खा. सुनील तटकरे यांच्या सूचनेनंतर उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नवीन प्रस्तावासह जॅकवेल व फिल्टर प्लांटजवळ सोलर सिस्टीम उभारणार

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे, ता. रोहा येथील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला आता ठोस प्रशासकीय दिशा मिळाली आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेबाबत मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या नवीन मंत्रालयीन इमारतीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पाणीपुरवठा विभागासह संबंधित विविध विभागांचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, सरपंच सुप्रिया महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहराध्यक्ष बाळासाहेब टके, ग्रामपंचायत सदस्य अकलाख पानसरे, सदस्या भाविका गिजे, विनिता पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व मनोज टके, धनंजय जगताप, कार्तिक जैन, केतन भोय आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बैठकीमुळे खा. तटकरे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत

दरम्यान, एका महत्त्वाच्या बैठकीमुळे खासदार सुनील तटकरे हे मंत्रालयातील बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी स्वतः मोबाईल कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यामुळे नागोठणेच्या शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या देखरेखीखाली योजना

बैठकीत नागोठणे पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या देखरेखीखाली राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. योजनेसाठी आवश्यक असलेला संपूर्ण नवीन प्रस्ताव जिल्हा परिषद, रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे.

या नवीन प्रस्तावासाठी नागोठणे ग्रामपंचायतीचा आवश्यक ठराव घेण्यात येणार असून, पाणीपुरवठा योजनेवरील वीज खर्च कमी करण्यासाठी सोलर सिस्टीम बसविण्याबाबत ग्रामपंचायतीचा स्वतंत्र ठराव करण्यात येणार आहे.
जॅकवेल व फिल्टर प्लांटजवळ सोलर सिस्टीम
पाणीपुरवठा योजनेचा वीज खर्च कमी करण्याच्या दृष्टीने जॅकवेलजवळ तसेच फिल्टर प्लांटजवळ अशा दोन ठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे योजनेच्या भविष्यातील वीज खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.

योजनेचा संपूर्ण, परिपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या आवश्यक प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करून महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन प्रस्ताव तातडीने शासनाकडे
नागोठणे ग्रामपंचायतीचा आवश्यक ठराव घेणे, सोलर सिस्टीमबाबत स्वतंत्र ठराव करणे आणि त्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत संपूर्ण तांत्रिक प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करून नागोठणेकरांचा शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

“योग्य अंदाजपत्रक द्या, आवश्यक निधी मंजूर करतो”
दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ढोबळ अंदाजपत्रक न देता योग्य पद्धतीने व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अंदाजपत्रक तात्काळ सादर करावे. त्यानंतर आवश्यक त्या निधीस तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन व दिलीपभाई टके यांना दिले.

नागोठणेकरांकडून खा. तटकरे यांचे आभार

नागोठणेकरांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आता ठोस प्रशासकीय दिशा मिळाल्याने नागोठणे ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

तसेच नागोठणेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न  मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन व दिलीपभाई टके यांचेही नागोठणेकरांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

मंत्रालयातील या बैठकीमुळे नागोठणे शहराच्या शुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला आता निर्णायक प्रशासकीय दिशा मिळाली असून, नवीन प्रस्ताव व निधी मंजुरीची पुढील कार्यवाही किती जलद होते, याकडे नागोठणेकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!