शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ; रायगड-पेण तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार कृषी सभापती वैकुंठदादा पाटील यांची ग्वाही; शिहू विभागात विकासकामांची मालिकाच सुरू

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ; रायगड-पेण तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
कृषी सभापती वैकुंठदादा पाटील यांची ग्वाही

शिहू विभागात विकासकामांची मालिकाच सुरू

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : पाऊस व्यवस्थित न पडल्यामुळे रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी दुर्दशा झाली असून, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असून, माझ्या जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ठाम ग्वाही रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध समितीचे सभापती वैकुंठदादा पाटील यांनी दिली.

पेण तालुक्यातील नागोठणे जवळील शिहू विभागातील गांधेपाडा येथील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिरात सामाजिक कार्यकर्ते अनंत भुरे यांच्या स्वखर्चातून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृह, लादी, रेलिंग तसेच मंदिराच्या स्लायडिंग खिडक्यांच्या कामांचे उद्घाटन व लोकार्पण वैकुंठदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी वैकुंठदादा पाटील यांच्या समवेत माजी खासदार भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा शर्मिलाताई वैकुंठ पाटील, पेण नगरसेवक निलकंठ म्हात्रे, युवा नेते अनंत भुरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे, भाजप शिहू विभाग अध्यक्ष प्रफुल पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. के. कुथे, नारायण म्हात्रे, देविदास भुरे, महिला सामाजिक कार्यकर्त्या मेघा अनंत भुरे यांच्यासह भुरे कुटुंबीय व विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिहू विभागात ८५ लाखांची विकासकामे
वैकुंठदादा पाटील पुढे म्हणाले की, शिहू विभागात विकासकामांची मालिकाच सुरू केली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून विविध विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता असून सत्तेतील व्यक्ती विकासकामे आणू शकतो. आता डीपीडीसीमधून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, त्यातील ५० टक्के निधी आपल्या विभागासाठी देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकांच्या अंत्योदयापर्यंत सेवा करण्याचे कार्य करा, असा आदेश भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे अखंडपणे समाजसेवेचे काम सुरू ठेवणार असून, कार्यकर्त्यांनी आपली ताकद निर्माण करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असा मौलिक सल्लाही वैकुंठदादा पाटील यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कुलदैवत कानिफनाथ मंदिरासाठी सामाजिक सभागृह
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सामाजिक कार्यकर्ते अनंत भुरे यांनी श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर हे भुरे कुटुंबीयांचे कुलदैवत असल्याचे सांगितले. गाव व समाजाला एकत्र आणण्यासाठी मंदिराची उभारणी करण्यात आली असून, या मार्गावरून जाणाऱ्या गावकरी, व्यापारी तसेच गरजू व्यक्तींना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी स्वखर्चातून सामाजिक सभागृह उभारून चांगली व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिहू विभागाचे प्रसिद्ध सूत्रसंचालक विजय पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!