पालकांनी मानसिकता बदलून पाल्यांना मराठीतून शिक्षण व संस्कार द्यावेत : महादेवसिंग परदेशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ७२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्री व खाऊ वाटप

पालकांनी मानसिकता बदलून पाल्यांना मराठीतून शिक्षण व संस्कार द्यावेत : महादेवसिंग परदेशी
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ७२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्री व खाऊ वाटप

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) — पालकांनी आपली मानसिकता बदलून आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आजच्या काळात इंग्रजी भाषा शिकणे ही गरज असली, तरी मराठी ही आपली मातृभाषा असून तिला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना मराठीतून शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे. रायगड जिल्ह्यात मराठीतून शिक्षण घेऊन अनेक विभूती घडल्या आहेत. आजच्या विद्यार्थ्यांमधूनही भविष्यात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती घडू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणेचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी केले.
नागोठणे येथील माहेरवासीनी कै. श्रद्धा हरी वैद्य उर्फ पुष्पा साठे व कै. वर्षा पाटणकर उर्फ माधुरी साठे यांच्या स्मरणार्थ हरी वैद्य व ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) रजिप कचेरी शाळा येथे शैक्षणिक साहित्य, छत्री व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागोठणे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या कचेरी शाळा, कन्याशाळा व श्री जोगेश्वरी नगर शाळेतील एकूण ७२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्री व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना महादेवसिंग परदेशी बोलत होते.
पुढे बोलताना परदेशी म्हणाले की, सध्याच्या काळात शिक्षण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झाले असून शिक्षणाला अर्थकारणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे पालकांनी केवळ खर्चिक शिक्षणाकडे न पाहता आपल्या पाल्याला योग्य वेळ, संस्कार आणि मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड व क्षमता वेगळी असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या आवडीचे व त्याच्या क्षमतेला अनुरूप शिक्षण दिल्यास त्याची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
आजचे युग मोबाईलचे असले तरी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ, वाचन आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नागोठणेचे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी, उपाध्यक्ष बना मोदगी, सचिव उल्हास शिंदे, खजिनदार दिलीप शहासने, केंद्रप्रमुख सुनील मोंढे, ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया काकडे, पुनम काळे, अमृता महाडिक, भाविका गिजे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुगंधा पिंपळे, मुख्याध्यापिका समा शेळके, विजया धनावडे, कल्याणी चौरे, शिक्षिका ज्योती सैंदाणे, दत्ता कडव, सुभाष भोय, सोनू जोशी आदी मान्यवरांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!