नागोठणे रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासाठी १००.६६ कोटींचा निधी मंजूर
खा. सुनील तटकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; ना. आदितीताई व आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने किशोरभाई जैन यांच्या प्रयत्नांना यश
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : महाराष्ट्र शासनाने राज्यातील रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी हाती घेतलेल्या ‘रेल्वे क्रॉसिंगमुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी योजनेत नागोठणे येथील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल १००.६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याने नागोठणे शहर व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रायगडचे खासदार तथा लोकनेते सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहार व पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुमारे १६० रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. नागोठणे येथील रेल्वे क्रॉसिंगचा या योजनेत समावेश व्हावा, यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी जुलै २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेत नागोठणे रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासाठी १००.६६ कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीसह पुढील कार्यवाही करण्याचे आदेश महारेलच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.
मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेले हे पत्र बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केले. यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, नागोठणे प्रवासी संघटनेचे सल्लागार ॲड. महेश पवार, अध्यक्ष ऋषिकेश भोय, सचिव संदेश सुकाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वाहतुकीची मोठी समस्या होणार दूर
नागोठणे येथील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे ये-जा करताना वारंवार फाटक बंद होत असल्याने नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः नवीन पूरग्रस्त पुनर्वसित नागोठणे गावठाण (जोगेश्वरी नगर) येथील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नागोठण्याच्या पूर्वेकडील डोंगर भागातील वासगावसह परिसरातील गावांमधील धनगर समाज, आदिवासी बांधव तसेच अन्य नागरिकांना रेल्वे फाटकावर अडकून राहण्याची समस्या भेडसावत आहे. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे या नागरिकांना सुरक्षित, जलद व अखंड वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच वासगावमार्गे रामेश्वर वैभव या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील अनेक गावांची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे.
रेल्वे ड्राय पोर्ट व औद्योगिक विकासाला चालना
नागोठणे येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे ड्राय पोर्ट (रेल्वे यार्ड)च्या विकासासाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मालवाहतूक अधिक सुलभ होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
उड्डाणपुलासोबत रेल्वे मार्गाच्या पूर्व बाजूस २० मीटर रुंदीचा समांतर रस्ता विकसित करण्यात आल्यास नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलात शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच उड्डाणपुलापासून कोंडगावपर्यंत रेल्वे मार्गालगत सेवा रस्ता विकसित झाल्यास कोंडगाव व बाहेरशिव परिसराच्या विकासातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होईल. पॉलीकॅब, रिलायन्ससह परिसरातील औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला गती मिळण्याबरोबरच भविष्यात नवीन उद्योग-प्रकल्प उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.
नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
नागोठणे रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाला १००.६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने नागोठणे शहर, पूर्वेकडील डोंगर भागातील गावांमधील नागरिक, धनगर व आदिवासी बांधव, विद्यार्थी, व्यापारी तसेच वाहनचालकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल नागोठणे शहर व विभागातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे तसेच या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे किशोरभाई जैन यांचे आभार व्यक्त केले आहेत.
▪️खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा वाहणार विकासाची गंगा – किशोरभाई जैन
– महारेलच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी नागोठण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम व नवनवीन आणि विविध विकास कामांच्या प्रस्तावांच्या बाबतीत खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. किशोरभाई जैन यांनी यावेळी या सर्व बाबतीत खा. सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन सादर केल्याने लवकरच या प्रस्तावांनाही खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध होणार असल्यामुळे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा विकासाची गंगा वाहणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला आहे.

