ग्रुप ग्रामपंचायत ऐनघरच्या नवीन घंटागाडीचे उद्घाटन

ग्रुप ग्रामपंचायत ऐनघरच्या नवीन घंटागाडीचे उद्घाटन

वाकणनाका (सुनील कोकळे): रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ऐनघरच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यासाठी नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. या घंटागाडीचे उद्घाटन शुक्रवार, दि. १२ जून रोजी ग्रुप ग्रामपंचायत ऐनघरच्या सरपंच कलावती राजेंद्र कोकळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक गोविंद शिद, सदस्य प्रकाश डोबळे, सचिन भोसले, विठ्ठल इंदुलकर, यशवंत शिद तसेच संतोष कनघरे, प्रभाकर उमासरे, महादेव भोईर, तुकाराम शिरसे, राजेंद्र कोकळे, राम तेलंगे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र जाधव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी घंटागाडीचे महत्त्व विषद करताना सांगितले की, गावातील घरगुती कचऱ्याचे नियमित संकलन व योग्य व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडी ही अत्यंत उपयुक्त व्यवस्था आहे. यामुळे गावातील स्वच्छता राखण्यास मदत होणार असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच पर्यावरण संरक्षणास चालना मिळून ग्रामस्थांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ ग्राम अभियान राबविण्यासाठी ही घंटागाडी महत्त्वाची भूमिका बजावणार असून ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक वाडी-वस्तीत नियमित कचरा संकलन सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत असून गाव अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!