वाघ्रणवाडी जंगलात नागोठणे पोलिसांचा धडक छापा : गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

वाघ्रणवाडी जंगलात नागोठणे पोलिसांचा धडक छापा : गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागोठणे (प्रतिनिधी) नागोठणे पोलीस ठाण्याने अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत वाघ्रणवाडी परिसरातील जंगलात सुरू असलेला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत अवैधरित्या दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व तयार दारूसह एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आज प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाघ्रणवाडी परिसरात अवैधरीत्या दारू निर्मिती करून विक्रीसाठी साठवणूक केली जात असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पेण जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली.

या मोहिमेत वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव व त्यांच्या पथकानेही सहभाग घेतला. पोलीस पथकाने सुमारे १५ किलोमीटर जंगलात आतपर्यंत जाऊन गावठी हातभट्टी दारूचा अड्डा शोधून काढला आणि तो समूळ उद्ध्वस्त केला.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनकर करीत आहेत. नागोठणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!