कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव आनंदात साजरा
वाकणनाका(सुनिल कोकळे): कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मधील नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रमेश मोसे यांच्या शुभहस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला पेन भेट देण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नारायण पानसरे, किशोर पाटील,संग्राम गायकवाड व सर्व सेवकवृंद उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक पालक आपल्या लाडक्या मुलांना शाळेत घेऊन आले होते. या वेळी काही नवीन विद्यार्थ्यांचे डोळे पाणवले होते तर काही आनंदी दिसत होते.

यावेळी प्राचार्य रमेश मोसे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदणीसाठी आवश्यक असणारे शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची माहिती दिली. तसेच शाळेमार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सोयी-सुविधा, शिष्यवृत्ती योजना आणि विशेषतः मुलींसाठी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली.
सदरील प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली.

