कोएसो मेहेंदळे हायस्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी
वाकणनाका (सुनिल कोकळे)दि.२०फेब्रु- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांच्या वतीने शिवकालीन विविध कार्यक्रम सादर करत प्राचार्य रमेश मोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी प्राचार्य रमेश मोसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिक्षक विलासराव जाधव,के आर पाटील,संग्राम गायकवाड, नारायण पानसरे तसेच एनसीसी कमांडर संदीप चांदोरकर व इतर सेवकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे औचित्य साधून एनसीसी कमांडर संदीप चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी ट्रूपच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. सदरवेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने सारा परिसर विद्यार्थांनी दणाणून सोडला.त्यानंतर शिवकालीन वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी गारद, पोवाडे,शिवगीते, नृत्य तसेच “गड आला,पण सिंह गेला” ही नयनरम्य नाटिका सादर करून उपस्थित पालक वर्गाचे तसेच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, मल्लखांब, तलवारबाजी आदी खेळ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण पानसरे यांनी केले तर फलक लेखन सुनील दाभाडे यांनी केले.

