लायन्स क्लबकडून वांगणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप
शिक्षण हे वाघिणीचे दूध; भरपूर शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा – अध्यक्ष विलास चौलकर
नागोठणे (शामकांत नेरपगार) :
नागोठणे लायन्स क्लबच्या माध्यमातून एमजेएफ लायन विजय गणात्रा यांच्या सौजन्याने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या वांगणी हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन विलास चौलकर म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन भरपूर अभ्यास करावा. आज मिळालेल्या वह्या आणि पेन हे तुमचे खरे मित्र आहेत. त्यांचा योग्य उपयोग करून ज्ञान आत्मसात करा आणि भविष्यात मोठे अधिकारी बनून समाजाची सेवा करा. तेव्हाच आमच्या या उपक्रमाचे खऱ्या अर्थाने समाधान मिळेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वांगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक टिळक खाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन विलास चौलकर, माजी अध्यक्ष लायन सखाराम ताडकर, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, लायन दौलत मोदी, लायन विजय शहासने, लायन सिद्धेश काळे, वांगणीचे माजी सरपंच लहुशेठ तेलंगे, भातगिरणी संस्थेचे संचालक राजूशेठ जांबेकर, सुजित चौलकर, मुख्याध्यापक टिळक खाडे, शिक्षिका तेजस्विनी गायकवाड, संस्कृती घरट तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

