नागोठणेकरांना लवकरच शुद्ध पाणी; तटकरे आक्रमक
रखडलेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी नव्याने निधी उपलब्ध करणार; फिल्टर प्लॅन्टची प्रत्यक्ष पाहणी
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : सन १९८९ नंतर नागोठणे परिसरात रिलायन्स प्रकल्पासह विविध औद्योगिक प्रकल्प आल्याने नागोठणे गावाचा झपाट्याने विकास झाला. त्याचबरोबर नागोठणेची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नागोठणेकरांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून तत्कालीन रायगड जिल्हा पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा योजना निर्माण करण्यात आली. मात्र विविध कारणांमुळे ही योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकलेली नाही.
“नागोठणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या या शुद्ध पाणीपुरवठा योजनेला आता गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार लोकनेते सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. योजनेतील त्रुटी दूर करून ती कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी खर्चाचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.”
नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन यांच्यासमवेत मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत योजनेतील त्रुटी, आवश्यक दुरुस्ती आणि निधीची उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजिलेल्या बैठकीत सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, रोहा पंचायत समिती सदस्या समृद्धी कोळी, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, माजी सरपंच विलास चौलकार, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, ग्रामपंचायत सदस्य तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महसूल विभाग, महावितरण, महापारेषण व एमआयडीसीचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे येथील फिल्टर प्लॅन्टला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योजनेची सद्यस्थिती, पाणी प्रक्रिया यंत्रणा, आवश्यक दुरुस्ती तसेच अडचणींची माहिती त्यांनी जाणून घेतली. योजनेतील त्रुटी दूर करून नागोठणेकरांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर नागोठणे ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुद्ध पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत खासदार तटकरे यांनी ग्रामस्थांना योजनेची पार्श्वभूमी व सद्यस्थितीची विस्तृत माहिती दिली. “नागोठणेकरांना शुद्ध पाणी मिळणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. दीर्घकाळ रेंगाळलेली ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपण केवळ बैठकीचा फार्स करीत नसून, योजनेतील त्रुटी दूर करून ती प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहोत,” असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांनी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून नेमकी कोणती कामे करण्यात आली, याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली.

यावर खासदार तटकरे यांनी संबंधित अधिकारी यांना जलजीवन मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
नागोठणेकरांच्या शुद्ध पाण्याच्या प्रश्नाला आता खासदार सुनील तटकरे यांनी गांभीर्याने हात घातल्याने रखडलेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेला गती मिळण्याची अपेक्षा नागोठणेकरांकडून व्यक्त होत आहे.

