नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सव भक्तिभावाने सुरू

नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सव भक्तिभावाने सुरू

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व वाघ्रेश्वर महाराज यांची विधिवत घटस्थापना करण्यात आली असून, सालाबादप्रमाणे यावर्षीही रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते बुधवार, दि. १९ ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.

            नवरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर, प्रांगण तसेच तीन तळी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसर उजळून निघत असून, या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसराला भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण प्राप्त झाले आहे.

               नवरात्रोत्सवाच्या काळात नागोठणे तसेच परिसरातील असंख्य भाविक श्री जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात येत आहेत. सुवासिनींकडून मातेची साडी-चोळी अर्पण करून पारंपरिक पद्धतीने ओटी भरून दर्शन घेतले जात आहे. नागोठणे शहरातील विविध आळीतील ग्रामस्थांना नवरात्रोत्सवात मातेचा मान देण्याची परंपरा असून, रात्रीच्या जागरणासाठी आळीनुसार पाळ्या नेमण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामस्थ भक्तिभावाने आपली पाळी बजावत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांचा मान खडक आळीतील ग्रामस्थांना मिळाला आहे.

              नवरात्रोत्सवाच्या नऊही दिवसांत रात्री ८ ते ९ या वेळेत मंदिर परिसरात गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येत आहे. या गरबा नृत्यात तरुण-तरुणी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून गरब्याचा आनंद घेत आहेत. त्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होत असून, रात्री १२ वाजता हरिजागराने दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होत आहे. विविध भक्तिमय कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांनी श्री जोगेश्वरी माता मंदिरात येऊन मातेचे दर्शन घेतले. यावेळी खडक आळी ग्रामस्थांचा मान होता. या प्रसंगी सपोनि रविंद्र पारखे, पो. हा. महेश लांगी व स्वप्नील भालेराव यांचा श्री जोगेश्वरी माता मंदिर उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच खडक आळीतील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता नवरात्रोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री जोगेश्वरी माता मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन व सचिव दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, खजिनदार सतीश पाटील, सहसचिव अनिल पवार यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!