नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी आमदार रविशेठ पाटील आक्रमक तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश; नुकसानभरपाईसाठी आंदोलनाचा सचिन मोदी यांचा इशारा
नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : दि.१९ ऑगस्ट-नागोठणे परिसरातील पूरग्रस्त व्यापारी वर्गाला शासनाकडून मंजूर होणारी नुकसानभरपाई मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर भाजप व्यापारी सेल रायगड जिल्हाध्यक्ष सचिन मोदी व भाजप रोहा तालुका महामंत्री आनंद लाड यांनी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांची पेण येथील निवासस्थानी भेट घेऊन नागोठण्यातील व्यापाऱ्यांची कैफियत मांडली.
यावेळी व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास महसूल विभागाकडून होत असलेला विलंब, वारंवार मागविण्यात येणारी कागदपत्रे तसेच तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याचा व्यापाऱ्यांना होणारा त्रास याबाबत सचिन मोदी यांनी आमदार रविशेठ पाटील यांचे लक्ष वेधले.
व्यापाऱ्यांची समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांनी तात्काळ रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत विचारणा केली. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून त्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले.
यावेळी तहसीलदार किशोर देशमुख यांनी आमदारांना माहिती देताना नागोठण्यातील व्यापाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नसून, शासनाच्या नियमानुसार काही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले.
मात्र, भाजप व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन मोदी यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांकडून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे एकाच वेळी मागविण्याऐवजी वारंवार वेगवेगळी कागदपत्रे मागविली जात असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता नुकसानभरपाई वितरणासाठी निश्चित तारीख जाहीर करून व्यापाऱ्यांना त्वरित मदत द्यावी. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे एकदाच मागवावीत,” अशी मागणी सचिन मोदी यांनी केली.
तसेच याबाबत आमदार रविशेठ पाटील यांच्या समवेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सचिन मोदी यांनी सांगितले.
नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही. प्रशासनाने प्रश्न सोडविण्यास दिरंगाई केल्यास व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सचिन मोदी यांनी दिला.
दरम्यान, तलाठी कार्यालयात कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी व्यापाऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असून, त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

