राजिप शाळा वरवठणेची शैक्षणिक सहल : पालकांकडून कौतुक
नागोठणे ( शामकांत नेरपगार )- नागोठणे जवळील वरवठणे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका सौ. सुचिता सतवाप पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष बैकर, शा. व्य. स. सदस्य तथा वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत लं. म्हात्रे यांच्या पुढाकाराने, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकार्याने बुधवार दि. ११/०३/२०२६ रोजी वरवठणे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विध्यार्थ्यांची काढलेली शिक्षणिक सहल अतिशय उस्ताही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सहलीचे पालकांकडून कौतुक करण्यात आले.
या शिक्षणिक सहली दरम्यान विध्यार्थ्यांनी
आमडोशी धरण व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जलशुद्धीकरण केंद्र नागोठणे येथे भेट दिली. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, मिळवलेल्या पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष जागी संबंध जोडता यावा, एखाद्या ठिकाणाचे बारकाईने निरीक्षण करणे, त्याबद्दल माहिती मिळविणे, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पर्यावरणाचे महत्त्व समजून घेणे, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, समूह भावना आणि शिस्त जोपासणे यांसाठी विविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सदर परिसर भेट सहलीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष संतोष बैकर यांनी दिली.
या सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांना प्रथम धरणावर नेण्यात आले. तेथील परिसराची, धरणाच्या पाणलोट क्षेत्राची, धरणाच्या जलसाठा क्षमतेची तसेच धरणाच्या दरवाज्यांचे कार्य व इतर यंत्रणा कशी राबवली जाते यांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. धरणक्षेत्राचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. तद्नंतर पालकांनी बनविलेल्या रुचकर जेवणाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला. धरण परिसरातील विविध वनस्पती, त्यांचे उपयोग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. म. रा. ओ. वि. महामंडळ जलशुद्धीकरण केंद्रात गणपत लं. म्हात्रे यांनी पाणी शुद्धीकरण कशा प्रकारे केले जाते, पाणी साठवणूक कशी केली जाते यांची माहिती विद्यार्थ्यांना व उपस्थितांना करून दिली. दरम्यान या सहलीसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष बैकर, ग्रामपंचायत सदस्य गणपत ल. म्हात्रे, तृप्ती रमाकांत म्हात्रे, राकेश दांडेकर साधना वारगे, सारीका करजेकर यांची फार मोलाची मदत झाली.

