पिगोंडेच्या साई म्हात्रेची इस्रो भेटीसाठी निवड; ग्रामपंचायतीकडून भव्य सत्कार

पिगोंडेच्या साई म्हात्रेची इस्रो भेटीसाठी निवड; ग्रामपंचायतीकडून भव्य सत्कार

नागोठणे (शामकांत नेरपगार) : नागोठणे जवळील पिगोंडे गावातील रायझिंग स्टार विद्यार्थी कुमार साई योगेश म्हात्रे याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भेटीसाठी निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यशाच्या जोरावर साईला ही संधी प्राप्त झाली आहे.
या यशाबद्दल रोहा पंचायत समिती सदस्या समृद्धी संतोष कोळी आणि पिगोंडेचे सरपंच संतोषभाई जनार्दन कोळी यांनी साईचा रोख ५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी समृद्धी कोळी यांनी सांगितले की, इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असून तेथील आधुनिक अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह प्रक्षेपण, हवामान अंदाज, दळणवळण व्यवस्था आणि अवकाश संशोधनाची माहिती साईला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन भविष्यात आणखी मोठे यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कोल्हापूर येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीतर्फे २०११ पासून इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते. रायगड जिल्ह्यात प्रथमच ही परीक्षा अशोक अहिरे यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ३,६१७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी शिक्षक सोनल पाटील, कमलाकर लेंडी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!