पहिल्याच प्रयत्नात एमबीए सीईटीत ९०.०४ टक्के गुण; वांगणीच्या मंथन ठाकूरची दमदार कामगिरी!
भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थेत बिझनेस एनालिटिक्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश
नागोठणे (शामकांत नेरपगार) – महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षेत नागोठण्याजवळील वांगणी-आमडोशी येथील कु. मंथन कांचन ठाकूर याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात ९०.०४ टक्के गुण मिळवत त्याने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
मंथन हा सुप्रिम पेट्रोकेम लिमिटेड कंपनीचे कामगार नेते कांचन ठाकूर यांचा सुपुत्र आहे. त्याने लोणेरे-माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून (बाटू) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेची अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. काही काळ नोकरी केल्यानंतर व्यवस्थापन क्षेत्रातील आवडीमुळे त्याने एमबीए सीईटी परीक्षेची तयारी केली आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविले.
या यशाच्या बळावर मंथन याला मुंबईतील बांद्रा येथील भुजबळ नॉलेज सिटीमधील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नामांकित संस्थेत दोन वर्षांच्या पूर्णवेळ बिझनेस एनालिटिक्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. व्यवसायातील माहिती व सांख्यिकीय विश्लेषणाच्या आधारे निर्णय घेण्याच्या या आधुनिक आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात तो पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे.
मंथन ठाकूरच्या या यशाबद्दल परिसरातून त्याचे अभिनंदन होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

