जुन्या शिक्षकांसाठी टीईटी सूटबाबतची बातमी संशयाच्या भोवऱ्यात; शिक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

जुन्या शिक्षकांसाठी टीईटी सूटबाबतची बातमी संशयाच्या भोवऱ्यात; शिक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

वाकणनाका (प्रतिनिधी)दि.(१ एप्रिल)- सोशल मीडियावर सध्या जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून पूर्ण सूट देण्यात आल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्यसभेत “विधेयक क्र. XXVII, सन २०२६” मांडण्यात आल्याचा दावा करत या संदेशात शिक्षकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

              या व्हायरल माहितीनुसार, टीईटीची अट भविष्यातील नियुक्त्यांसाठीच लागू राहणार असून, जुन्या शिक्षकांच्या सेवेला कोणताही धोका नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सेवा सुरक्षितता, पदोन्नती व निवृत्ती वेतन अबाधित राहील, असेही या संदेशात म्हटले आहे.

               मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा, राजपत्रातील स्पष्ट अधिसूचना किंवा विश्वासार्ह वृत्तमाध्यमांमधील पुष्टी आढळून येत नाही. त्यामुळे या बातमीच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

          याबाबत लोकनायक मराठी न्यूज पोर्टल च्या प्रतिनिधीनी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता सांगण्यात आले की,टीईटी संदर्भात असा मोठा निर्णय घेण्यासाठी कायदेशीर दुरुस्ती आवश्यक असते आणि त्याची अधिकृत नोंद सार्वजनिकरित्या उपलब्ध असते. अधिकृत माहिती अथवा प्रपत्र आल्यास कळविले जाईल.सध्या तरी अशा प्रकारची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी या बातमीवर विश्वास ठेवू नये. 
           त्यामुळे अशा प्रकारच्या अप्रमाणित संदेशांमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून शिक्षकांनी केवळ अधिकृत स्रोतांवर आधारित माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवा पसरविणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!