खेड तालुक्यातील आस्तान येथे १० एप्रिल रोजी श्री संत बाळूमामा भंडारा उत्सवाचे आयोजन
नागोठणे(सुनिल कोकळे) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नजीकच्या आस्तान धनगरवाडा येथे शुक्रवार दि १० एप्रिल रोजी श्री केदार काळकाई मंदिराच्या परिसरात श्री संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात येणार आहे.
या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ ते ६ वाजता मान्यवरांचे आगमन व सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी मा. श्री. कृष्णात बाबुराव ढोणे महाराज उपस्थित राहणार असून ते श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान आदमापूरचे भागवत कथनकार मानकरी आहेत.
त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ वाजता अभिषेक व आरती, रात्री ८ ते १० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तसेच रात्री १० वाजता श्री बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित कीर्तन सेवा ह.भ.प. विकास देवडे महाराज यांच्या सुश्राव्य आवाजात सादर करण्यात येणार आहे.
“सदरील आयोजित उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तरुण कार्यकर्ते प्रशांत आखाडे यांच्यासोबत रविंद्र गोरे, दगडू आखाडे, सुनिल आखाडे, रुपेश आखाडे, सुरेश आखाडे, सतीश आखाडे, तेजस हिरवे, गोविंद खरात,स्वप्नील आखाडे, संदीप आखाडे, रुपेश गोरे आणि श्री संत बाळूमामा भक्तगण व आस्तान गावाचे ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. तरी उत्सवासाठी परिसरातील जास्तीत जास्त भक्तगणांनी उपस्थित राहून तिर्थ व महाप्रसादाचा तसेच दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.”


