पाली जवळील गौळमाळ येथे हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वाकणनाका(सुनिल कोकळे)दि.३१ मार्च– सुधागड तालुक्यातील श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर पाली जवळील गौळमाळ धनगरवाडा येथे बुधवार (दि. १ एप्रिल)रोजी हनुमान जयंतीनिमित्त प्रवचन,भजन, कीर्तन,हरिपाठ व पालखी सोहळा आणि हळदीकुंकू अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून, गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. बुधवार (दि.१ एप्रिल) रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत जानेश्वरीच्या अध्यायांचे सामूहिक पारायण होणार असून, त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत जेष्ठ ग्रामस्थ धाकू धुळया बावदाने यांसकडून भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यानंतर दुपारी २ ते ३ वाजता ह.भ.प. जयेश महाराज चव्हाण यांचे सुश्राव्य असे प्रवचन आयोजित करण्यात आले असून, ३ ते ५ या वेळेत गौळमाळ गावातील माहेरवासिनी व महिलामंडळ यांच्यासाठी हळदीकुंकू कार्यक्रम,सायंकाळी ५ ते ६ दीपोत्सव तसेच ६ ते ७ महिला मंडळाच्या वतीने हरिपाठ कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ७.३० ते ८.३० दरम्यान जेष्ठ नागरिक व समाजसेवक देवजी धोंडू कोकरे यांच्या तर्फे भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यानंतर रात्री ९ ते ११ या वेळेत खोपोली येथील प्रसिध्द ह.भ.प. चंद्रकांत (तात्या) महाराज चोरघे यांचे कीर्तन होणार असून, उशिरा प्रासादिक भजन मंडळ वऱ्हाड येथील धीरज बुवा खंडागळे यांचा जागरण-भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
त्याचप्रमाणे गुरुवार(दि.२एप्रिल) रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म सोहळा साजरा केला जाईल. सकाळी ७ ते ९ श्री हनुमान पालखी सोहळा आणि ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. राम महाराज महाडिक यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी दुपारी १२ वाजता कै.काळू मालू कोकरे यांच्या स्मरणार्थ मालूशेठ काळू कोकरे यांच्या कुटुंबियांच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
“ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आरडीसीसीचे उपाध्यक्ष सुरेश शेठ खैरे,सु.ए.सो च्या अध्यक्षा गीताताई पालरेचा, राजिप सदस्या सौ.शर्मिला बोडके तसेच सुधागड पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे उपस्थित राहणार आहेत. तसेच रघुनाथ बावधाने, जीवन कोकरे,रमेश बर्गे,भाऊ मालू कोकरे, धाऊ कोंडू बर्गे, राम केंडे,उमेश बर्गे, यांच्या सोबत ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ व क्रीडा मंडळ गौळमाळ सदरील कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत.तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.”


