एक गाव, एक गोविंदा’ संकल्पनेला किशोरभाई जैन यांची भक्कम साथ; आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या ९ थरांच्या संकल्पाला दिला विश्वासाचा शब्द आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाचा उत्साहात शुभारंभ; मागील वर्षीच्या यशस्वी गोविंदांचा सत्कार, दहीहंडी उत्सवही यंदा जल्लोषात साजरा होणार

एक गाव, एक गोविंदा’ संकल्पनेला किशोरभाई जैन यांची भक्कम साथ; आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या ९ थरांच्या संकल्पाला दिला विश्वासाचा शब्द
आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाचा उत्साहात शुभारंभ; मागील वर्षीच्या यशस्वी गोविंदांचा सत्कार, दहीहंडी उत्सवही यंदा जल्लोषात साजरा होणार

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) :
‘एक गाव, एक गोविंदा’ या प्रेरणादायी संकल्पनेमुळे प्रभावित होऊन आई जोगेश्वरी गोविंदा पथकाला कायमस्वरूपी सहकार्य करण्याचा शब्द दिला असून, यावर्षी पथकाने ठेवलेला ९ थरांचा संकल्प निश्चितच यशस्वी होईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.
           रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरात एक गाव एक गोविंदा चे पुरस्कर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांच्या हस्ते आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी उपस्थित गोविंदाप्रेमी तरुणाई व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला किशोरभाई जैन यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके, नागोठणेच्या सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, शहराध्यक्ष बाळासाहेब टके, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे, भाविका गिजे, संजय काकडे, अनिल महाडिक, मनोज टके, बिपीन सोष्टे, शिंदे शिवसेना शहरप्रमुख संतोष चितळकर, प्रसाद जोगत, शेखर जोगत, ॲड. रमेश जाधव, केतन भोय, आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे अध्यक्ष भरत गिजे, मार्गदर्शक राजेश सुर्वे, स्वप्नील भोसले, संदीप राऊत, प्रविण आमडोसकर, निलेश पिंपळे यांच्यासह गोविंदा पथकाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


          किशोरभाई जैन पुढे म्हणाले की, मागील वर्षी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात उल्लेखनीय यश मिळवून सुधागड, रोहा आणि पेण तालुक्यात नागोठणे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. यावर्षी पथकाने ९ थर रचण्याचा निर्धार केला असून, या परिसरात आजपर्यंत कुणीही अशी कामगिरी केलेली नसल्याने हे यश ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
           ते पुढे म्हणाले, “नागोठणे गावातील तरुणांनी पक्ष, मतभेद बाजूला ठेवून ‘एक गाव, एक गोविंदा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन देणे ही गावातील प्रमुख मंडळींची जबाबदारी आहे. यश मिळाल्यानंतर अनेक जण मदतीला येतात; मात्र आम्ही या पथकाच्या यश-अपयशाचा विचार न करता सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
              जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “पराभवामुळे मी खचलो नाही. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. माझा कोणाविषयीही राग नाही. लोकसेवेसाठी मी कायम तयार आहे. किशोरभाई जैन मित्रमंडळ हे पक्षविरहित मंडळ असून समाजकार्यासाठी सातत्याने कार्यरत राहील.”
              मागील वर्षी गोविंदा खेळताना जखमी व आजारी झालेल्या अनेक तरुणांची आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने पूर्ण बरे होईपर्यंत काळजी घेतली. यावर्षी तेच सर्व तरुण पुन्हा सरावासाठी मैदानात उतरल्याचे पाहून विशेष आनंद झाल्याचे सांगत त्यांनी पथकाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
यावेळी किशोरभाई जैन यांनी जाहीर केले की, त्यांच्या पुरस्कृत दहीहंडी उत्सवाचे आयोजन यंदाही मोठ्या जल्लोषात करण्यात येणार असून ही परंपरा कधीही खंडित होणार नाही. या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
                कार्यक्रमादरम्यान मागील वर्षी पथकाच्या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व गोविंदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरावाच्या शुभारंभाला विशेषतः तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण परिसरात गोकुळाष्टमीचा उत्साह अनुभवायला मिळाला.
                गोकुळाष्टमीपर्यंत मार्गदर्शक राजेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दररोज नियमित सराव करून यंदाच्या स्पर्धांमध्ये अधिकाधिक यश संपादन करण्यासाठी मेहनत घेणार आहेत. तसेच, या निमित्ताने श्री जोगेश्वरी माता आणि श्री भैरवनाथ महाराज यांना आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या वतीने चांदीचे मुकुट अर्पण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!