नागोठण्यात चैत्र पौर्णिमेला भक्तीचा महापूर! श्री जोगेश्वरी माता–भैरवनाथ महाराज पालखी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ : खासदार सुनील तटकरे यांनी घेतले दर्शन

नागोठण्यात चैत्र पौर्णिमेला भक्तीचा महापूर!
श्री जोगेश्वरी माता–भैरवनाथ महाराज पालखी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ : खासदार सुनील तटकरे यांनी घेतले दर्शन

नागोठणे (शामकांत नेरपगार) –

             चैत्र पौर्णिमेच्या पावन निमित्ताने नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरात विधिवत पूजाअर्चा व आरती झाल्यानंतर सकाळी १० वाजता पुजारी मधुकर पोवळे यांच्या हस्ते पालखी मंदिराबाहेर काढण्यात आली.
           नागोठणे ग्रामपंचायतीने काटेकोर पद्धतीने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण शहर चकाचक दिसत असून, पालखी सोहळ्यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, किशोरभाई जैन, विलास चौलकर, संतोष कोळी, बाळासाहेब टके, सचिन कळसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
        पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्य, बेंजो, लेझीम व घोडानाचाच्या तालावर संपूर्ण परिसर दणाणून गेला. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. दांडपट्ट्याचे खेळ व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
                 पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरीसाठी गेलेले नागरिक, सासुरवाशीण व पाहुणे नागोठण्यात दाखल झाल्याने गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, मंडप व स्वागत बॅनर लावण्यात आले असून ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, थंड पेयांची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

      जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांच्या सहकार्याने हभप संतोष उर्फ बुवा इप्ते यांनी पंढरपूर येथून आणलेल्या आकर्षक ‘माऊली’ टोप्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरल्या. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समिती अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, खजिनदार जितेंद्र कजबजे, सहसचिव अनिल पवार, सहखजिनदार सतिश पाटील व सर्व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.

खासदार सुनील तटकरे : श्री जोगेश्वरी मातेचे निस्सीम भक्त   

                  नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिराशी खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भक्तिमय नाते आहे. मंदिराचे मुख्य विश्वस्त तथा तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते कै. तात्यासाहेब टके यांचे कै दत्ताजीराव तटकरे परम स्नेही होते. खासदार सुनील तटकरे हे आपल्या पिताश्री कै. दत्ताजीराव तटकरे यांच्या समवेत कै. तात्यासाहेब टके यांच्या निवासस्थानी नेहमी येत असत. त्या काळात चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा होत असे. याच काळात त्यांनी श्री जोगेश्वरी मातेचा महिमा आत्मसात केला.
              तेव्हापासून आजतागायत, कितीही व्यस्त शेड्युल असले तरी खासदार सुनील तटकरे हे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला नागोठण्यात उपस्थित राहून श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतात.
ही भक्तीपरंपरा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालू ठेवली असून मा. आमदार अनिकेतभाई तटकरे व नामदार अदितीताई तटकरे हे देखील या सोहळ्यास उपस्थित राहून परंपरा जपतात.
             तसेच नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या १४ वर्षांपासून खासदार तटकरे उपस्थित राहत आहेत. विशेष म्हणजे, ते प्रत्येकवेळी प्रथम श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊनच कार्यक्रमात सहभागी होतात.
यावरून खासदार सुनील तटकरे हे श्री जोगेश्वरी मातेचे निस्सीम भक्त असून त्यांच्या सामाजिक कार्यात आणि आयुष्यात मातेचा सतत आशीर्वाद लाभत असल्याची भावना नागोठणे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!